Uddhav Thackeray Raj Thackeray Alliance: मराठी भाषेच्या मुद्द्यावरुन 5 जुलै रोजी 19 वर्षानंतर एकत्र आलेले उद्धव ठाकरे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे राज ठाकरे राजकीय युती करणार का? असा प्रश्न अनेकांना पडला आहे. ठाकरे बंधु एकत्र आल्यास महाराष्ट्राच्या राजकारणावर काय परिणाम होणार? दोन्ही भाऊ एकत्र येत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लढणार का? असे प्रश्न विचारले जात असतानाच या दोघांनाही एकत्र आणण्यासाठी मागील दीड दशकांपासून प्रयत्न करणारे मनसेचे नेते बाळा नांदगावकर यांनी ठाकरे बंधुंबद्दल सूचक विधान केलं आहे. त्यांच्या विधानामुळे दोन्ही ठाकरे समर्थकांमध्ये संभ्रमाचं वातावरण निर्माण झालं आहे. राज आणि उद्धव यांच्यामध्ये पुन्हा राजकीय युतीवरुन काही बिनसलं का? असा सवाल उपस्थित केला जातोय.
ठाण्यातील विष्णू नगर येथील मनसेच्या कार्यालयाला बाळा नांदगावकर यांनी रविवारी भेट दिली. यावेळी त्यांनी मनसेच्या कार्यकर्त्यांशी संवाद साधून त्यांना मार्गदर्शन केले. यावेळी प्रसारमाध्यमांशी बोलताना बाळा नांदगावकर यांनी, "उद्धव आणि राज या दोन्ही ठाकरे बंधूंनी आता ठरवायचे आहे की त्यांचे प्रेम टिकवायचे की नाही. मी अजूनही त्या दोघांना विचारले नाही की त्यांचे प्रेम टिकून राहणार का?" असे वक्तव्य केले. त्यांच्या या विधानामुळे आता ठाकरे बंधू एकत्र येणार की नाही याबद्दल संभ्रम निर्माण झाला आहे.
"माझे ठाणे शहराशी जुने ऋणानुबंध आहेत. येथील दहीहंडी उत्सवाला मी खूप पूर्वीपासून येतो. मनसेप्रमुख राज ठाकरे हे येत्या 18 जुलैला मिरा भाईंदर येथे येणार आहेत. तत्पूर्वी 14 ते 16 जुलैदरम्यान इगतपुरी येथे मनसेच्या कार्यकर्त्यांचे शिबीर होणार आहे," अशी माहिती बाळा नांदगावकर यांनी दिली. "मला कार्यकर्त्यांना भेटायला आणि त्यांच्याशी संवाद साधायला नेहमीच आनंद वाटतो. असे ते म्हणाले. "तसेच पक्षाचे प्रवक्ते सोडून इतर लोक बोलतात म्हणून अडचण येते. कार्यकर्ते व्यक्त होत असतात. मग त्याची सावरासावर नेत्यांना करावी लागते. या अनुषंगाने कोणी काही बोलू नये अशी सूचना मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी केली होती," असे नांदगावकर म्हणाले.
"महापालिका निवडणूक आली म्हणून आम्ही एकत्र आलो नाही. विषय कोणी दिला? हिंदीची सक्ती राज्य सरकारने आणली. विषय तुम्ही दिला तर मराठी माणूस पेटून उठणारच. राज ठाकरे यांचा स्वभाव सर्वांना माहिती आहे. ते मराठीच्या मुद्द्यावर कोणतीही तडजोड करत नाहीत. त्यांनी हा विषय लावून धरला. हिंदी सक्तीचा विषय आणला नसता तर पुढचं घडल नसतं. विषय तुम्हीच आणला. म्हणूनच राज ठाकरे त्यांच्या भाषणात बोलले की, जे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना जमले नाही ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना जमले. विषय तुम्ही आणला तो धरून आम्ही पुढे गेलो," असं नांदगावकर म्हणाले.
"अजून निवडणुका खूप लांब आहेत. त्याची तारीख पण निश्चित झाली नाही. इतर पक्षांपेक्षा दोन्ही ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या मुद्द्यावर भाजपाकडूनच अधिक बोलले जात आहे. आता दोन्ही ठाकरे बंधूंनी ठरवायचे की त्यांचे प्रेम टिकवायचे की नाही. मी अजूनही त्या दोघांना विचारले नाही की, त्यांचे प्रेम टिकून राहणार की नाही. त्यामुळे त्यावर भाष्य करणे मला उचित वाटत नाही. यावर वरिष्ठानी बोलणे योग्य ठरेल. मी कनिष्ठ आहे," असे नांदगावकर यांनी सांगितले.
तर मिरा - भाईंदर येथील घटनेबाबत बोलतांना नांदगावकर म्हणाले की, तुम्ही चुका करणार आणि आम्हाला विचारणार. तुम्ही महाराष्ट्र राहतात तर मराठी बोलण्यात अडचण काय आहे? असा सवाल त्यांनी उपस्थित केला. "त्यांनी गरज नसताना मोर्चा काढला. अरे ला कारे ते होणारच. गरज नसताना त्यांनी विषय वाढवला. राज ठाकरे लढवव्ये असल्याने त्यांचे कार्यकर्ते ही लढवव्ये आहेत," असे शेवटी नांदगावकर यांनी सांगितले.