Marathi News> महाराष्ट्र बातम्या
Advertisement

'ऑफिसमध्ये महिलांनी शॉर्ट्स, सीव्हलेस लेगिंग्ज घालू नका', आधी आणले कठोर निर्बंध; पुढे जे झालं...

Banned Women from Wearing Shorts: बांगलादेश बँकेने जारी केलेला आदेश वादात सापडला.

'ऑफिसमध्ये महिलांनी शॉर्ट्स, सीव्हलेस लेगिंग्ज घालू नका', आधी आणले कठोर निर्बंध; पुढे जे झालं...

Banned Women from Wearing Shorts: भारताचे शेजारी राष्ट्र  बांगलादेशातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. ज्यामुळे तालिबानच्या क्रूर धोरणांची आठवण झाल्याशिवाय राहणार नाही. बांगलादेशच्या मध्यवर्ती बँकेने (सेंट्रल बँक) नुकताच एक आदेश जारी केलाय. ज्यामध्ये महिला कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना कार्यालयात शॉर्ट्स, स्लीव्हलेस कपडे आणि लेगिंग्ज घालण्यास मनाई करण्यात आली. या आदेशात असेही म्हटले गेले की, या नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल. हा आदेश समोर येताच सोशल मीडियावर तीव्र प्रतिक्रिया उमटल्या आणि त्याची तुलना थेट तालिबानच्या धोरणांशी केली गेली.

काय आहे नेमकं प्रकरण?

तीन दिवसांपूर्वी बांगलादेश बँकेने हा वादग्रस्त आदेश जारी केला होता, ज्यामध्ये महिला कर्मचाऱ्यांना "सभ्य आणि व्यावसायिक" कपडे घालण्याचे निर्देश देण्यात आले होते. आदेशात साडी, सलवार-कमीज, डोक्यावर स्कार्फ किंवा हिजाब घालण्याचा सल्ला देण्यात आला होता. याशिवाय, महिलांना औपचारिक सँडल किंवा बूट घालण्याची परवानगी देण्यात आली होती. सर्व कर्मचारी आणि अधिकाऱ्यांनी देशाच्या सामाजिक आणि सांस्कृतिक नियमांचे पालन करत योग्य वेशभूषा करावी, असेही या आदेशात नमूद करण्यात आले होते.

सोशल मीडियावरुन काय होतेय टीका?

हा आदेश सोशल मीडियावर व्हायरल होताच, लोकांनी त्यावर तीव्र नाराजी व्यक्त केली. अनेकांनी या निर्णयाला "तालिबानी" संबोधत टीका केली. एका यूजरने लिहिले, "बांगलादेश बँकेने महिलांना लहान बाह्यांचे कपडे आणि लेगिंग्ज घालण्यास मनाई केली आहे, जणू हा इस्लामीकरणाचा एक भाग आहे. पण यात दुटप्पीपणा म्हणजे, बँकेच्या गव्हर्नरची मुलगी मात्र तिला हवे ते कपडे घालते!" दुसऱ्या एका यूजरने उपरोधिकपणे म्हटले, "बँकांचे संकट यापेक्षा कितीतरी गंभीर आहे, पण बांगलादेश बँकेचे सगळे लक्ष महिलांच्या ड्रेस कोडवर आहे. याऐवजी बँकिंग क्षेत्रात सुधारणा करणाऱ्या आर्थिक योजना तयार केल्या पाहिजेत."

का मागे घ्यावा लागला आदेश?

सोशल मीडियावर आणि जनमानसातून जोरदार टीका झाल्याने बांगलादेश बँकेला हा आदेश मागे घ्यावा लागला. तरीही या प्रकरणाने बांगलादेशातील सामाजिक आणि सांस्कृतिक वातावरणावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. अनेकांनी हा आदेश महिलांच्या स्वातंत्र्यावर घाला घालणारा आणि कट्टरपंथीय विचारसरणीला प्रोत्साहन देणारा असल्याचे म्हटले आहे. या घटनेमुळे बांगलादेशातील महिलांच्या कपड्यांवरील निर्बंध आणि त्यामागील मानसिकतेवर व्यापक चर्चा सुरू झाली आहे.

बॅंकांनी काय काळजी घ्यायला हवी?

बांगलादेश बँकेच्या या निर्णयाने देशात आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरही मोठा वाद निर्माण झालाय. तालिबानच्या धोरणांशी तुलना होत असताना, हा आदेश मागे घेण्यात आला असला तरी यामुळे सामाजिक नियम, महिलांचे स्वातंत्र्य आणि कट्टरपंथीय विचारसरणी यांवर गंभीर चर्चा सुरू झालीय. बँकेने भविष्यात अशा निर्णयांबाबत अधिक सावधगिरी बाळगण्याची गरज व्यक्त केली जातेय.

Read More