Ajit Pawar News: काही काही जण चुका करत आहेत, रस्त्यावर कचरा टाकत आहेत. जनावरे चरायला सोडत आहेत मी त्यांना कृपा करून सांगतो आता ती जनावर कोंडवड्यात घातली तर ठीक, नाही ऐकलं तर त्यांना बाजार दाखवतो. आता जे मालक लोक आहेत त्यांना निर्वाणीचा इशारा देतो, ऐकलं तर ठीक नाही ऐकलं तर मालकांवर केसेस होतील, असे अजित पवार यांनी म्हटले. बारामतीत एका हॉस्पिटलच्या उद्घाटनादरम्यान बोलत होते. ज्यांची गाढव आहेत जनावरे आहेत, ज्यांच्या गाई इकडेतिकडे फिरत असतात तुम्ही तुमच्या दारात बांधायचे ते बांधा काय खायला प्यायला घालायचं ते घाला बारामती जी चांगली करतो ती काय सगळ्यांना मोकळी फिरण्याकरता नाही, असंही ते म्हणाले आहेत.
कधी कधी मोटरसायकलवाले इकडे तिकडे बघतात, हळूच ओव्हरटेक राँग साईडने जाण्याचा प्रयत्न करत आहेत. असा माणूस सापडला तर तो मुलगा किंवा व्यक्ती कितीही मोठ्या बापाची असली तरी त्याला टायरमध्ये घेऊन असा झोडायला सांगणार आहे की त्याला दहा पिढ्या आठवल्या पाहिजे. अजिबात नियम कोणीही तोडू नका, मग तो अजित पवार असो किंवा अजित पवाराचा कोणी नातेवाईक असेल. सर्वांना नियम सारखा आहे. मी जे करतो ते बारामतीकरांसाठी, सर्वांसाठी करतो, असे म्हणत बेशिस्त वाहन चालवणाऱ्यांना अजित पवारांनी फटकारले.
मी अनेक ठिकाणी झाडं लावली आहेत, तिथे कोणी पण येत आहे, जनावरं खात आहेत. पण, तसं चालणार नाही. जिथे माणसांना बसायला केलं आहे तिथे एकजण मोटरसायकल घालून निवांत मांडी घालून लोकांसोबत गप्पा मारतोय. गाडी वळवली आणि पोलिसांना सांगितले की, याची गाडी ताब्यात घे आणि याला चांगला टायरमध्ये घाल, मग तो म्हणतोय दादा चुकलं, असंही त्यांनी म्हटलं आहे.
मी बारामतीला होतो तेव्हा पहिलं आईकडे जातो, कालच बारामतीला आलो आईकडे गेलो, दर्शन घेतले गप्पा मारल्या. प्रत्येकाने आईशी प्रेमाने आपलेपणाने वागावं. आपण समाजात आपल्या आई बापामुळे आहोत. जीवात जीव असेपर्यंत आई-बापाला विसरू नका. काही काही नवीन पिढी आई बापाकडे नीट बघत नाही, त्यांना सांगतो हे वागणं बरं नव्हं, असे म्हणत अजित पवारांनी आई-वडिलांच्या मुलांप्रतीच्या त्यागाबद्दल सांगितलं.