Beed Crime News : बीड जिल्ह्यातील गुंडगिरी सुरुच आहे. परळीतील मारहाणीच्या दोन घटना ताज्या असताना आणखी एका तरुणाला मारहाण करतानाचा व्हिडिओ समोर आला आहे. परळीतील योगीराज गित्ते या तरुणाला चार जणांच्या टोळक्यांकडून बेदम मारहाण करण्यात आली. या मारहाणीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय. व्हिडिओत मारहाण करणारा आरोपी आदित्य गित्ते यानेच शिवराज दिवटे याला देखील मारहाण केली होती.
बीड जिल्ह्यातील दहशत काही केल्या थांबण्याचे नाव घेताना दिसत नाही. परळीतील योगीराज गित्ते या तरुणाला चार जणांच्या टोळक्याकडून मारहाण होत आहे. मारहाण करत असताना त्याचेही व्हिडीओ चित्रीकरण करण्यात आले आहे. सध्या हा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.
दृश्यात दिसणारा हाच तो आरोपी आदित्य गित्ते आहे, त्याच्यासह टोळक्याने ही मारहाण केली आहे. घटना पाच महिन्यापूर्वीची असल्याचे समजते. या व्हिडिओनंतर जिल्ह्यात पुन्हा एकदा दहशत माजली आहे. दोन दिवसापूर्वी शिवराज दिवटे याला देखील मारहाण करणारा हाच आदित्य गित्ते आहे.
परळीच्या टोकवाडी परिसरात लिंबोटा येथील रहिवासी असलेल्या शिवराज दिवटे याला दोन दिवसापूर्वी अमानुष मारहाण झाली होती. त्याचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी सात आरोपीला अटक केली. त्यानंतर मात्र बीडमध्ये तणावपूर्ण स्थिती निर्माण झाली आहे. आता याच प्रकरणातील दुसरा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. शिवराज दिवटे याच्या मित्रांनी परळी शहरातील समाधान मुंडे याला मारहाण केली होती. 16 मे रोजी दुपारी दोन वाजून पाच मिनिटांनी ही मारहाण झाली. त्यानंतर समाधान मुंडे याच्या मित्रांनी मिळून शिवराज दिवटे याला टोकवाडी परिसरात अमानुष मारहाण केली. समाधान मुंडे याला मारहाण करतानाचा हा व्हिडिओ समोर आल्यानंतर शहरातील तरुणांमधील किरकोळ वाद किती टोकाला पोहोचलाय याची प्रचिती येतेय. या व्हिडिओ नंतर शिवराज दिवटे याच्यासह त्याच्या मित्रांवर गुन्हा दाखल होण्याची शक्यता आहे.
बीडच्या परळीतील शिवराज दिवटे मारहाण प्रकरणी आरोपींवर कठोर कारवाई करण्यात यावी. अशी मागणी भाजप आमदार सुरेश धस यांनी केलीय. या
दरम्यान, प्रकरणातील 2 आरोपी हे अल्पवयीन असून पुण्यातील पोर्शे प्रकरणानुसार त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी. अशी मागणीही धस यांनी केली. तर बीडमधील गुंडगिरीत पोलीसच सहभागी आहेत असा आरोप विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंनी केलाय.