Beed Crime: बीडमधून एक धक्कादायक बातमी समोर आलीय. तुम्ही मकरंद अनासपुरेंचा जाऊ तिथे खाऊ हा सिनेमा बघितला असेल.. त्यात शेतकऱ्याची विहीर चोरीला जाते. मात्र बीडमध्ये त्याचा पुढचा अंक बघायला मिळाला. इथं विहिरीतलं पाणीच चोरीला गेलंय. नेमकं काय घडलंय. जाणून घेऊयात.
रंभा काशिद यांच्यावर हताश होऊन पदर पसरवत धाय मोकलून रडण्याची वेळ आलीय. बीडच्या साक्षाळ पिंपरी गावतले हे रंभा आणि त्र्यंबक काशिद दाम्पत्य 4 दिवस पाहुण्यांच्या गावी गेले. आणि मागे विपरीत घडलं. त्यांच्या विहिरीतलं 4 ते 5 टँकर पाणी चोरीला गेलं. चोरट्यांनी उरलं सुरलं पाणीही गढूळ करुन सोडलं. काशिद कुटुंब जेव्हा गावात परत आलं तेव्हा त्यांना विहिरीनं तळ गाठलेला बघून धक्काच बसला. घरातल्या माऊलीने तर पिकं जगवायची कशी म्हणून हंबरडा फोडला.
त्र्यंबक काशिद यांची अवघी 3 एकर शेती आहे. तिथं त्यांनी विविध फळबाग आणि झाडांची लागवड केली होती. गेल्यावर्षी पाण्याअभावी अनेक फळझाडं जळून गेली म्हणून त्र्यंबक काशिद यांनी विहीर बांधली. त्यात सध्या अडीच परस पाणी होतं. ते सगळ्यांनी चोरुन नेलं. उरलेलं बांधाला सोडलं. चोर इथंच थांबले नाहीत तर त्यांनी डीपी आणि मोटारीची तोडफोड केली.
विहिरीतलं पाणी चोरीला गेल्याची बातमी बीड जिल्ह्यात वाऱ्यासारखी पसरली. या प्रकरणात आता शिवसेना ठाकरे गटांनही लक्ष घातलंय. पोलिसांनी तातडीनं या पाणीचोरांचा छडा लावण्याची मागणी त्यांन केलीय.
एरवी दरोडा, घरफोडी, साहित्यांची चोरी अशा चोरीच्या घटना दररोज आपल्या कानावर पडत असतात. मात्र गुन्हेगारीच्या बिहारी पॅटर्नमुळे चर्चेत असलेल्या बीड जिल्ह्यात चोरीचा वेगळाच पॅटर्न समोर आलाय. बीडच्या मातीत जन्मलेले मराठी अभिनेते मकरंद अनासपुरेंचा 'जाऊ तिथे खाऊ' या चित्रपटात विहिरी चोरीला गेलेला किस्सा आपण पाहिला. आता त्यांच्याच जिल्ह्यात विहिरीतलं पाणी चोरीला गेलंय. यातून चोरांनी गुन्ह्याचा किती तळ गाठलाय हेच अधोरेखित होतंय.