Marathi News> महाराष्ट्र बातम्या
Advertisement

'खोक्या भाई'ला अटक! उत्तर प्रदेशमधील प्रयागराजमध्ये बीड पोलिसांची कारवाई

Khokya Bhosale Arrested: मागील आठवड्याभरापासून खोक्या भोसलेचा विषय राज्यभरात चर्चेचा विषय ठरतोय. यावरुन सत्ताधाऱ्यांना विरोधकांनी धारेवर धरलेलं असतानाच पोलिसांना खोक्याला अटक करण्यात यश आलं आहे.

'खोक्या भाई'ला अटक! उत्तर प्रदेशमधील प्रयागराजमध्ये बीड पोलिसांची कारवाई

Khokya Bhosale Arrested: सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा वारंवार पाठपुरावा करणारे भारतीय जनता पार्टीचे आमदार सुरेश धस यांचा समर्थक सतीश भोसले उर्फ खोक्या भाईला प्रयागराजमधून अटक करण्यात आली आहे. मागील आठवड्याभराहून अधिक काळापासून 'खोक्या भाई' प्रकरणावरुन राज्यातील राजकारण तापलं होतं. अखेर पोलिसांना या खोक्या भाईच्या मुस्क्या आवळण्यात यश आलं आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सतीश भोसले आज स्वतः पोलिसांना शरण जाणार होता मात्र त्यापूर्वीच पोलिसांनी त्याच्या मुस्क्या आवळल्या आहेत. बीड पोलीस आणि प्रयागराज पोलीस यांच्या माध्यमातून त्याला अटक करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. प्रयागराजहून सतीश भोसलेला बीडकडे आणले जात आहे.

त्या व्हिडीओमुळे चर्चेत

मागील आठवड्यात एका व्यक्तीला बेदम मारहाण करतानाचा शिरुरमधील धक्कादायक व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला. या व्हिडिओत दिसणारा इसम हा सतीश भोसले असल्याचं नंतर समोर आलं. एका व्यक्तीला मारहाण करताना दिसत आहे. दरम्यान, या प्रकरणी सतीश भोसलेसह 4 जणांवर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता. तेव्हापासूनच पोलीस या खोक्या भाईच्या मागावर होते.

अनेक व्हिडीओ व्हायरल झाले अन्...

हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर खोक्या भाईचे अनेक व्हिडीओ सध्या समोर आले. दुसऱ्या व्हिडीओत खोक्या भाऊ हा हेलिकॉप्टरमधून उतरताना दिसला. एखाद्या हिरोला देखील लाजवेल अशी खोक्या भाऊ एन्ट्री असल्याचं अनेकांनी हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर खोचकपणे म्हटलं. तिसऱ्या व्हिडीओत 'लाईफ हो तो खोक्या भाई जैसी...' म्हणत खोक्या भाऊ फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये लक्झरिअस लाईफ जगतोय, असं दाखवण्यात आलं आहे. या व्हिडीओच्या माध्यमातून त्याची गुन्हेगारी पार्श्वभूमी चर्चेत आल्यानंतर तपासाची चक्रे वेगाने फिरु लागली. एका व्हिडीओत सतीश भोसले कारमध्ये पैसे फेकताना दिसला. 

सुरेश धसांची पहिली प्रतिक्रिया...

'खोक्या भाई'ला अटक केल्यानंतर विधानसभेच्या इमारतीबाहेर पत्रकारांशी संवाद साधताना सुरेश धस यांनी, "खोक्याला अटक झाली ही अत्यंत चांगली बाब आहे. त्यानं जी चूक केली त्यावर कारवाई व्हावी. जी कलम लागली आहेत त्यानुसार कारवाई होईल," असं म्हटलं आहे.

सतीश भोसले उर्फ 'खोक्या भाई'बद्दल थोडक्यात

- सतीश भोसले बीडच्या शिरूर शहराजवळीस पारधी वस्तीत वास्तव्यास आहे.

- शिरूर कासार परिसरात सतीश भोसलेची 'खोक्या पार्टी' नावानं दहशत आहे.

- सतीश भोसले मित्रांसोबत लॅविश लाईफ जगतो.

- गेल्या काही वर्षांपासून खोक्या भाई सक्रिय राजकारणात सहभागी झाल्याचं दिसत आहे.

- खोक्या भाई भाजप आमदार सुरेश धस यांचा कट्टर समर्थक असल्याचं त्याच्या अनेक पोस्टवरुन दिसून येतो. अनेकदा त्याने या पोस्टमध्ये तसा दावाही केला आहे.

- गोल्डमॅन म्हणूनही स्थानिक पातळीवर सतीश भोसलेची ओळख आहे.

Read More