Marathi News> महाराष्ट्र बातम्या
Advertisement

संतापजनक आणि धक्कादायक! परळी वैद्यनाथ मंदिर परिसरात शिजवले आम्लेट, मांसाहारी अन्न

Beed Parli Vaijnath Temple Controversy: या मंदिरातील बांधकामावरुन काही दिवसांपूर्वीच उपमुख्यमंत्री अजित पवारांनी कंत्राटदाराला झापलं होतं.

संतापजनक आणि धक्कादायक! परळी वैद्यनाथ मंदिर परिसरात शिजवले आम्लेट, मांसाहारी अन्न

Beed Parli Vaijnath Temple Controversy: परळीतील श्री क्षेत्र वैद्यनाथ मंदिर परिसरात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. सध्या या ठिकाणी तीर्थक्षेत्र विकासाअंतर्गत बांधकाम सुरु आहे. मात्र वैद्यनाथ मंदिराच्या पूर्व प्रवेशद्वारावरच मांसाहारी पदार्थ शिजवण्यात आल्याचा प्रकार घडला आहे. येथे बांधकामाचं कंत्राट देण्यात आलेल्या कंत्राटदाराकडे कामाला असलेल्या कामगारांनी चक्क मंदिराच्या प्रवेशद्वाराच्या पूर्व पायऱ्यावरील नियोजित दर्शन मंडपातच चूल मांडून आम्लेट मांसाहारी अन्न शिजवताना दिसून आले. संतापजनक प्रकार कॅमेरात कैद झाल्याने एकच खळबळ उडाली आहे. 

दोघांनी कॅमेरात कैद केला हा प्रकार

शिवसेना शिंदे गटाचे तालुकाप्रमुख व्यंकटेश शिंदे आणि भारतीय जनता युवा मोर्चाचे पदाधिकारी योगेश पांडकर यांनी मंदिराच्या आवारामध्ये मांसाहारी पदार्थ शिजवल्याचा प्रकार कॅमेरात कैद केला. मंदिर परिसरात कामे करताना ऐतिहासिक, धार्मिक महत्व लक्षात घेवून कामे करावी अशा सूचना लोकप्रतिनिधींकडून वारंवार दिल्या जातात. असं असतानाही हा प्रकार घडल्याबद्दल आश्चर्य व्यक्त केलं जात आहे.

अजित पवारांनीच येथील बांधकामावरुन सुनावलेलं

खुद्द उपमुख्यमंत्री अजित पवारांनी याच इमारतीच्या बाजूला असलेल्या पायऱ्यांबाबत सबंधित गुत्तेदाराला खडे बोल सुनावले होते. आता तर वैद्यनाथ मंदिराच्या परिसरात धार्मिकदृष्ट्या निषिद्ध मानल्या जाणारे मांसाहारी पदार्थ शिजवले जात असल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी संबंधित ठेकेदारावर तत्काळ कारवाई करावी अशी मागणी करण्यात येत आहे. दरम्यान मंदिर प्रशासनाकडून त्यांची भूमिका अद्याप समोर आलेली नाही.

वैद्यनाथ मंदिराबाबत

परळी येथील हे वैद्यनाथ मंदिर देशभरात प्रसिद्ध असून भारतातील 12 ज्योतिर्लिंगांत परळीच्या वैद्यनाथ ज्योतिर्लिंगाचे देवस्थान जागृत समजले जाते. हे मंदिर देवगिरीच्या यादवांच्या काळात त्यांचा प्रधान श्रीकरणाधिप हेमाद्री याने बांधले आहे, अशी मान्यता आहे. शनिवारी म्हणजेच 31 मे 2025 रोजी 300 वी जयंती साजरी करण्यात आलेल्या पुण्यश्लोक राणी अहिल्याबाई होळकरांनी या मंदिराचा जीर्णोद्धार केला आहे.

परळीमधील हे मंदिर चिरेबंदी आणि भव्य असं आहे. मंदिराच्या परिसरातील लांबलचक पायऱ्या व भव्य प्रवेशद्वार हे मुख्य आकर्षणाचा विषय आहेत. मंदिराचा गाभारा व सभामंडप हे एकाच पातळीवर असल्यामुळे सभामंडपातून ज्योतिर्लिंगाचे दर्शन होऊ शकते. या ठिकाणचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे येथे देवाला स्पर्श करून दर्शन घेता येते. मंदिराच्या परिसरात तीन मोठी कुंडे आहेत. महाशिवरात्रीच्या दिवशी वैद्यनाथ जयंती असते. हा दिवशी येथे भाविकांची मोठी गर्दी असते. 

Read More