Santosh Deshmukh Murder Case Daughter Statement: बीडमधील मसाजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणामध्ये त्यांची मुलगी वैभवी देशमुखने नोंदवलेला धक्कादायक जबाब 'झी २४ तास'च्या हाती लागला आहे. 9 डिसेंबर रोजी संतोष देशमुख यांची निर्घृण हत्या करण्यात आली. अमानुष छळ करुन संतोष देशमुख यांची वाल्मिक कराडच्या गुंडांनी हत्या केल्याचं तपासात हळूहळू समोर येत आहे. मात्र संतोष देशमुख या गुंडांना भेटायला जाण्याआधी घरी काय घडलं होतं हे त्यांची मुलगी वैभवी देशमुखने पोलिसांकडे नोंदवलेल्या जबाबामधून समोर आलं आहे.
संतोष देशमुख यांनी 9 डिसेंबर रोजी घरातून निघण्याआधी वैभवीशी संवाद साधला होता. यावेळेस संतोष देशमुख यांनी मुलीला, "माझे काही बरे वाईट झाले तर आई आणि विराजची काळजी घे," असं सांगितलं होतं. यासंदर्भातील उल्लेख वैभवीच्या जबाबामध्ये आहे. मात्र हा संवाद होण्याआधी संतोष देशमुख फोनवर कोणाशी तरी बोलत होते. या फोन कॉलवर संतोष देशमुख काय म्हणालेले याची माहितीही वैभवीने दिली आहे.
"भाऊ एवढं काय झालं नाही. कशाला एवढं ताणता भाऊ? एवढ्या लहान गोष्टीसाठी जीवावर उठता का? असं ते म्हणत होते. पप्पाचा हा फोन दहा ते 12 मिनिटे सुरू होता," असं वैभवी देशमुख यांनी पोलिसांकडे नोंदवलेल्या जबाबात म्हटलं आहे. तसेच हा कॉल विष्णू चाटेचाच होता असं संतोष देशमुख यांनी मुलीला सांगितलं होतं. तिनेच हा खुलासा जबाब नोंदवताना केला आहे.
सरपंच संतोष देशमुख यांच्या शवविच्छेदन अहवालातून देशमुख यांच्या शरीरावर गंभीर जखमा झाल्याचे समोर आले आहे. आरोपींच्या मारहाणीत देशमुखांचे शरीर काळे-निळे पडले होते. त्यांच्या डोळ्याखालील देखील काळे व्रण होते, असं धक्कादायक वास्तव शवविच्छेदन अहवालातून समोर आले आहे. असंख्य जखमा आणि अतिरक्तस्त्राव झाल्यामुळं देशमुखांचा मृत्यू झाल्याचे पोस्टमार्टम रिपोर्टमध्ये नमूद करण्यात आलं आहे. संतोष देशमुख यांच्या नाकातून रक्त येईपर्यंत त्यांना मारहाण करण्यात आल्याचे समोर आले आहे. देशमुखांच्या हनुवटी, कपाळ आणि दोन्हा गालांवर जखमा आहेत. तसंच, छाती-गळ्यावरदेखील जबर मारहाण करण्यात आली होती. जवळपास दीड-दोन तास मारहाण करण्यात आल्याचे समोर आले आहे.