Beed Santosh Deshmukh Murder News: बीडच्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर संपूर्ण महाराष्ट्रात एकच खळबळ उडाली होती. काही दिवसांपूर्वीच संतोष देशमुख हत्या प्रकरणात दाखल झालेल्या आरोपपत्रात अनेक भयंकर खुलासे समोर आले. या आरोपपत्रात देशमुखांची हत्या कशी करण्यात आली त्याचे फोटोदेखील समोर आले होते. हे फोटोपाहून अवघा महाराष्ट्र हादरला होता. आता देशमुखांच्या शवविच्छेदनाचे रिपोर्ट समोर आले आहे. यात देशमुखांची हत्या कशी झाली याचा विस्तृत अहवाल देण्यात आला आहे.
सरपंच संतोष देशमुख यांच्या शवविच्छेदन अहवालातून देशमुख यांच्या शरीरावर गंभीर जखमा झाल्याचे समोर आले आहे. आरोपींच्या मारहाणीत देशमुखांचे शरीर काळे-निळे पडले होते. त्यांच्या डोळ्याखालील देखील काळे व्रण होते, असं धक्कादायक वास्तव शवविच्छेदन अहवालातून समोर आले आहे. असंख्य जखमा आणि अतिरक्तस्त्राव झाल्यामुळं देशमुखांचा मृत्यू झाल्याचे पोस्टमार्टम रिपोर्टमध्ये नमूद करण्यात आलं आहे.
संतोष देशमुख यांच्या नाकातून रक्त येईपर्यंत त्यांना मारहाण करण्यात आल्याचे समोर आले आहे. देशमुखांच्या हनुवटी, कपाळ आणि दोन्हा गालांवर जखमा आहेत. तसंच, छाती-गळ्यावरदेखील जबर मारहाण करण्यात आली होती. जवळपास दीड-दोन तास मारहाण करण्यात आल्याचे समोर आले आहे.
संतोष देशमुख यांची निर्घृणपणे हत्या करण्यात आली होती. त्यांच्या बरगडीलादेखील जखमा आहेत. बरगड्यादेखील तुटल्या होत्या. तसंच, हाताच्या मुठीवर जखमा आहेत व मधल्या बोटालादेखील जखम होती. दंडावर, मनगटावर, पोटरीवर, मांडीवर, गुडघ्यावरदेखील मारहाणीच्या जखमा आहेत. संतोष देशमुख यांची पाठ मारहाणीमुळं संपूर्ण काळी-निळी पडली होती. या अहवालावरुनच संतोष देशमुख यांना किती निर्घृणपणे मरण देण्यात आले हे पुन्हा एकदा समोर आले आहे.
संतोष देशमुख यांची हत्या करताना आरोपींचे व्हिडिओ आणि फोटोदेखील समोर आले आहेत. हे फोटो व्हायरल झाल्यानंतर संतोष देशमुख यांची मुलगी वैभवी देशमुख हिची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे. हे फोटो पाहून वैभवीला अश्रू अनावर झाले आहेत. आरोपी मारहाण करताना हसत आहेत हे अत्यंत दुर्दैवी आहे. कोणत्यातरी वरच्या व्यक्तीचा हात असल्याशिवाय एवढ करणं शक्य नाही, असं तिने म्हटलं आहे.