Huskur Madduramma Fair Viral Video: बेंगळुरूच्या अनेकल तालुक्यात आयोजित हुस्कुर मड्डुरम्मा जत्रेत मोठी दुर्घटना घडली आहे. शनिवारी जत्रा सुरू असताना 150 फुट उंच भव्य रथ कोसळला आहे. मुसळधार पाऊस आणि वादळ यामुळं रथ कोसळल्याचे समोर आले आहे. ही भयंकर दुर्घटना कॅमेऱ्यात कैद झाली आहे आणि याचा व्हिडीओदेखील सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या दुर्घटनेत एकाचा मृत्यू झाला आहे.
दरवर्षी मार्च महिन्यात ही जत्रा मोठ्याप्रमाणात भरते. जत्रा पाहण्यासाठी लाखोंच्या संख्येने भाविक येतात. या जत्रेची खास ओळख म्हणजे येथील भव्यदिव्य असा रथ असतो. गावकरी हा रथ खेचून जत्रेच्या ठिकाणी घेऊन जातात. यावर्षी डोड्डनगामंगला आणि रायसंद्रा गावातून रथ आणण्यात आला होता. हा रथ बैल, ट्रॅक्टर, जेसीबी मशीन आणि गावकऱ्यांच्या मदतीने खेचण्यात येत होता.
दुर्घटना घडली त्यावेळी मोठ्या प्रमाणात घटनास्थळी गर्दी होती. रथ हुस्कुर मड्डुरम्मा मंदिराजवळ पोहोचला त्याचवेळी अचानक हवामान बदलले. अवकाशात काळे ढग जमले आणि सोसाट्याचा वारा सुटला. मुसळधार पाऊस सुरू झाला त्यामुळं रथ अस्थिर झाला. रथ एकीकडे झुकला आणि तिथे जमलेल्या भाविकांवर कोसळला. लोक जीव वाचवण्यासाठी सैरावरा पळू लागले. मात्र दुर्दैवाने एका व्यक्तीचा रथाच्या खाली दबून त्या व्यक्तीचा मृत्यू झाला.
ಹುಸ್ಕೂರು ಜಾತ್ರೆಯಲ್ಲಿ, ದೊಡ್ಡ ನಾಗಮಂಗಲದ ಮತ್ತು ರಾಯಸಂದ್ರ ದ ಎರಡು ತೇರುಗಳು ಮಳೆ ಬಿರುಗಾಳಿಯ ಹೊಡೆತಕ್ಕೆ ಸಿಲುಕಿ ಧರೆಗೆ ಉರುಳಿ ಬಿದ್ದಿದ್ದಾವೆ #BengaluruRains pic.twitter.com/ZLV8XM4P5u
— ನಿಶಾ ಗೌರಿ (@Nisha_gowru) March 22, 2025
या दुर्घटनेचा व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर पोस्ट करण्यात आला आहे. आत्तापर्यंत लाखो लोकांनी हा व्हिडिओ पाहिला आहे. तर, अनेक लोक व्हिडिओवर कमेंट करत आहेत.
ही जत्रा संस्कृती आणि परंपरेचा एक हिस्सा आहे. रथ खेचणे हे गावकऱ्यांसाठी प्रतिष्ठा मानली जाते आणि लोक यात पूर्ण उत्साहाने सहभागी होतात. मात्र या दुर्घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. प्रशासनाकडून या दुर्घटनेची गंभीर दखल घेण्यात आली आहे. तसंच, प्रशासनाकडून सुरक्षा व्यवस्थेवरुन प्रश्न उपस्थित करण्यात येत आहेत.