Bharat Gogawale: 'नॅपकिनमध्ये गोर-गरिबांचे आशीर्वाद आहेत. ते काखेत उराशी आमच्या असतात. ते पडू नयेत. त्यांच्या आशीर्वादावरच आमचं चाललं आहे. दुसरं आमच्याकडे आहेच काय', असं वक्तव्य शिवसेनेचे नेते भरत गोगावले यांनी केले आहे. भरत गोगावले यांची नॅपकिन घ्यायची स्टाइल फारच लोकप्रिय आहे. त्यांना नॅपकीन शेठ असं देखील म्हटलं जातं. हे नाव त्यांना कसं पडलं आणि नॅपकीन नेहमी ते जवळ का बाळगतात, याचे कारणच त्यांनी सांगितलं आहे. झी 24 तासच्या टू द पाँइट कार्यक्रमात त्यांनी काही आठवणींना उजाळा दिला आहे.
काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादीचे नेते सुनील तटकरे यांनी भरत गोगावलेंची नक्कल केली होती. तटकरेंनी नॅपकीन दाखवून केलेल्या नकलेचा व्हिडिओही समाजमाध्यमांवर व्हायरल झाला होता. त्यांनतर भरत गोगावलेंनी नॅपकीन ठेवण्याबाबत उत्तर दिलं आहे. नॅपकिनमध्ये गोर-गरिबांचे आशीर्वाद आहेत. ते काखेत उराशी आमच्या असतात. ते पडू नयेत. त्यांच्या आशीर्वादावरच आमचं चाललं आहे. दुसरं आमच्याकडे आहेच काय. ह्यांच्यासारखे मोठे वैभव आमच्याकडे नाहीये. मी एका सामान्य शेतकऱ्याचा मुलगा आहे, असं भरत गोगावलेंनी म्हटलं आहे.
'ग्रामीण भागात पिपंळगाव नावाचं गाव आहे. तिथे आमचे वडिल-अजोबांनी शेतीचा व्यवसाय करून आम्हाला वाढवलं. तिसरीमध्ये मी नापास झालो. तेव्हा मी मुंबईत आलो. मोठे चुलते होते त्यांनी आणलं मला. मी शिक्षण घेत असताना स्वतःच्या पायावर उभा होतो. मी सकाळी पेपर, दुधाची लाइन टाकायचो, दादरला जाऊन फुलं आणायचो आणि गजरे गुंफायचो,' असंही त्यांनी म्हटलं आहे.
'कल्याणपासून ते सीएसटीपर्यंत महिलांच्या डब्यात चढायचो. गजऱ्याच्या पाट्या घेऊन गजरे विकायचो. सिक्युरीटीचं काम केले. सीताराम मिलमध्ये काल केलंय. नंतर काही तरुण मुलं भेटली मग वेगळ्या मार्गाकडे जाण्याचा योग आला. तेव्हापासून शिवसेनेच्या संपर्कात आलो. मी 17 वर्ष मुंबईला राहिलो. नंतर वडिल वारल्यानंतर गावी गेलो. आमच्याच नात्यातील एका मुलीशी लग्न केले आणि गावी घेऊन गेलो. तीपण मला लक्ष्मी मिळाली. घरच्यांनी स्विकारलं कारण नात्यातीलच होती. नंतर गावी गेल्यावर शेती व्यवसायात गुंतलो. नंतर लाकडाचा, कोळसाचा धंदा केला. आम्ही मेहनत केली. कोणावर काही प्रसंग आला तर सढळ हस्ते मदत केली. त्याचे सगळे आशीर्वाद हे या नॅपकीनमध्ये आहे, असं भरत गोगावलेंनी म्हटलं आहे.