कोल्हापूरमधून अत्यंत महत्त्वाची बातमी समोर येत आहे. कोल्हापूरच्या अंबाबाई आणि जोतिबा मंदिरात ड्रेस कोड लागू करण्यात आला आहे. आता भाविकांना दर्शनाला येताना विशिष्ट प्रकारच्या पेहराव्यात येणे बंधनकारक असणार आहे. पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीने हा निर्णय घेतला आहे.
मे महिन्याच्या मुलांच्या सुटट्या सुरु झाल्या की अनेक भाविक आपल्या कुटुंबासह कोल्हापूरच्या अंबाबाई आणि जोतिबाच्या दर्शनाला येतात. तसेच मुंबईत स्थायिक झालेले कोल्हापुरकर देखील मोठ्या संख्येने दर्शनासाठी येतात. अशावेळी भाविकांनी मंदिरात जाण्यापूर्वी ड्रेस कोडबाबत दक्ष असणे गरजेचे आहे. कोणत्याही प्रकारचे कपडे घालून आता देवदर्शनाला येऊ शकत नाहीत.
अंबाबाई आणि जोतिबा मंदिरात आता ड्रेस कोड लागू करण्याचा निर्णय पश्चिम महाराष्ट्र समितीच्या वतीने घेण्यात आला आहे. मंदिरात देव दर्शनाला येताना शॉर्ट कपडे घालण्यास मनाई आहे. मंदिराच्या परिसरात येताना पारंपरिक कपडे आणि संपूर्ण शरीर झाकले जाईल असेच कपडे घालून प्रवेश करणे बंधनकारक आहे. मंदिरात दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना उद्यापासून म्हणजे 15 मे पासून ड्रेस कोडच्या नियमांचे पालन करणे बंधनकारक आहे.
करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिरात पुणे एटीएस पथक दाखल झालं आहे. भारत पाकिस्तान तणावाच्या पार्श्वभूमीवर तसेच वस्त्र संहिता लागू केल्याच्या पार्श्वभूमीवर पुणे आणि कोल्हापूर एटीएस पथकाकडून मंदिराची पाहणी करण्यात आली. करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिर, मंदिराचा परिसर तसेच सीसीटीव्ही रूम मधून प्रत्येक गोष्टींची माहिती घेतली जात आहेय