चंद्रकांत फुंदे, झी २४ तास, पुणे : पुण्यात महात्मा गांधींच्या पुतळ्याची विटंबना करण्यात आली आहे. एका व्यक्तीनं महात्मा गांधींचा पुतळा तोडण्याचा प्रयत्न केला. मात्र, पुतळ्याला हात लावण्याआधीच सुरक्षा रक्षकांनी रोखलं. दरम्यान या प्रकरणी सूरज शुक्ला नावाच्या व्यक्तीला ताब्यात घेण्यात आलंय.. तसंच त्यानं केलेल्या कृत्यानंतर महाराष्ट्रात चांगलंच राजकारण तापलं आहे.
पुणे रेल्वे स्टेशनजवळच्या महात्मा गांधींच्या पुतळ्याची विटंबना करण्यात आली आहे. भगवे वस्त्र घातलेल्या एकानं महात्मा गांधी यांच्या पुतळ्याच्या पायथ्याशी चढून कोयत्यानं त्यांचं शिर कापण्याचा प्रयत्न केला. स्थानिक सुरक्षारक्षकांनी तातडीनं हस्तक्षेप केला आणि कोणतेही नुकसान होण्यापूर्वीच हे कृत्य रोखलं. आरोपीला तत्काळ अटक करण्यात आली असून त्याला पोलिसांच्या स्वाधिन करण्यात आलं आहे. सूरज शुक्ला असं ताब्यात घेतलेल्या व्यक्तीचं नाव आहे. तरुणानं असं कृत्य का केलं याची माहिती अद्याप मिळू शकलेली नाही आहे. पोलिसांकडून त्याचा तपास सुरू आहे. दरम्यान, या प्रकारामुळे संतप्त झालेल्या काँग्रेस कार्यकर्त्यांनी गांधींच्या पुतळ्याजवळ आंदोलन केलं आहे.
यानंतर काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी गांधींच्या पुतळ्याला दुग्धाभिषेक घातला. राजकीय वर्तुळातूनही या घटनेचा निषेध नोंदवण्यात आला आहे..सुरज शुक्लाच्या रुपानं नव्या नथुराम गोडसेनं तोंड वर काढलं आहे. गांधींचा विचार संपवणं शक्य नसल्याचं आमदार रोहित पवारांनी म्हटलं आहे.
राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनीही तिखट शब्दात या घटनेचा निषेध केला. तसंच विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनीही निषेध करून प्रतिक्रिया दिलीय.
नथुराम गोडसेनं गांधींजींना संपवलं पण त्यांचे विचार संपू शकले नाहीत...महात्मा गांधींचे विचार अजरामर आहेत. आता पुन्हा एक नथुराम समोर आला आहे. गोडसेंच्या विचारांना मानणारे सुरज शुक्लासारखे अनेक लोक आहेत.ते सातत्यानं गांधीविरोधाचं विष ओकत असतात...मात्र, एकटे महात्मा गांधी शेवटपर्यंत अशा नथुरामांना पुरून उरणार, हेही तितकंच खरं आहे.