Maharashtra Politics : भाजप आणि राष्ट्रवादीच्या पक्षप्रवेशानं शिवसेनेत अस्वस्थता आहे. कारण भाजप आणि राष्ट्रवादीत जे प्रवेश घेतायेत ते नेते शिवसेनेच्या आमदारांचे विरोधक आहेत. शिवसेना आमदारांच्या विरोधकांना पक्षात घेऊन त्यांना ताकद का दिली जाते असा प्रश्न शिवसैनिकांना पडलाय. एकनाथ शिंदेंची ही कोंडी करण्याची रणनिती तर नाही ना असा संशय या निमित्तानं घेतला जातोय.
महायुती सरकारमध्ये नक्की काय चाललंय हे समजायला मार्ग नाही. गेल्या काही दिवसांत भाजप आणि राष्ट्रवादीत सुरु असलेले पक्षप्रवेश पाहता हे पक्षप्रवेश शिवसेनेसाठी अडचणीचे असल्याचं सांगण्यात येतंय. महायुतीतच शिवसेनेची कोंडी करण्याची योजना तर नाही ना अशी चर्चा आता शिवसैनिकांमध्ये सुरु झालीये. धाराशिवच्या भूम-परांडाचे माजी आमदार आणि राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे नेते राहुल मोटे यांनी अजितदादांच्या राष्ट्रवादीत प्रवेश केला. वास्तविक पाहता भूम परांडाचे आमदार हे शिवसेनेचे तानाजी सावंत आहेत. तानाजी सावंतांसमोर आव्हान म्हणून राहुल मोटेंचा प्रवेश झाला नाही ना असा संशय घेतला जातोय.
शिवसेनेविरोधातही तटबंदी फक्त भूम परांड्यातच नाही तर राज्यभर अशाच प्रकारचे पक्षप्रवेश सुरु आहेत. पुरंदरमध्ये शिवसेनेचे विजय शिवतारे आमदार आहेत. तिथं काँग्रेसच्या संजय जगतापांना भाजपनं प्रवेश दिला. कर्जत-खालापूरमध्ये शिवसेनेचे महेंद्र थोरवे आमदार आहेत तिथं राष्ट्रवादीतून निलंबित केलेल्या सुधाकर घारेंना पक्षात घेऊन जिल्हाध्यक्ष केलं महाडमध्ये शिवसेनेचे भरत गोगावले आमदार आहेत तिथं ठाकरेंच्या पक्षातील स्नेहल जगतापांना राष्ट्रवादीत घेण्यात आलं. जालन्यात शिवसेनेचे अर्जुन खोतकर आमदार आहेत तिथं काँग्रेसच्या कैलास गोरंट्याल यांना भाजपमध्ये प्रवेश देण्यात आला.
जिथं शिवसेनेची ताकद आहे किंवा जिथं शिवसेनेचा आमदार आहे तिथं मोठा नेता पक्षात घेऊन त्याला ताकद देण्यामागं भाजप राष्ट्रवादीला नक्की साधायचं काय आहे असा प्रश्न पडतो. राष्ट्रवादी मात्र आम्ही बेरजेचं राजकारण करतोय अशी गोंडस संज्ञा मांडताना दिसतेय. शिवसेनेच्या नजरेतून या गोष्टी सुटलेल्या नाहीत. पण शिवसेनेसाठी ही गोष्ट म्हणजे बोलताही येत नाही आणि सहनही होत नाही असं झालंय. तरीही शिवसेनेचे नेते या तटबंदीमुळं अस्वस्थता नसल्याचं सांगू लागलेत. शिवसेना हो म्हटली तर शिवसेनेसह आणि नाही म्हटली तर शिवसेनेशिवाय अशी तयारी तर पडद्यामागून सुरु नाही ना अशा संशयाला जागा आहे. मात्र या इन्कमिंगमुळं शिवसेनेची महायुतीतली बार्गेनिंग पॉवर कमी केली जाणार हे मात्र नक्की...