Devendra Fadnavis Salary Information: राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा आज 55 वा वाढदिवस आहे. 2014 साली पहिल्यांदा मुख्यमंत्रिपदाच्या खुर्चीवर विराजमान झालेल्या फडणवीसांची सध्या तिसरी टर्म सुरु आहे. 2019 च्या सत्ता नाट्यादरम्यान ते 72 तासांसाठीही मुख्यमंत्री राहिले. 2024 च्या निवडणुकीमध्ये भाजपाच्या नेतृत्वाखाली महायुतीमधील एकनाथ शिंदेंची शिवसेना आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीने अभुतपूर्व यश मिळवत एकहाती सत्ता मिळवली आणि फडणवीस तिसऱ्यांदा मुख्यमंत्री झाले. फडणवीस यांचा जन्म 22 जुलै रोजी 1970 साली झाला. आज भाजपा समर्थकांबरोबरच देवेंद्र फडणवीसांच्या निकटवर्तीयांकडूनही त्यांचा वाढदिवस उत्साहात साजरा केला जात आहे. फडणवीस यांच्या राजकारणाबरोबरच ते त्यांच्या खासगी आयुष्यासाठीही अनेकदा चर्चेत राहिले.
करिअरच्या सुरुवातीला मॉडेल म्हणून केलेलं फोटोशूट असो, तरुणपणातील आंदोलनं असो किंवा आता पत्नी अमृता फडणवीस यांच्या मुळेही सातत्याने चर्चेत येणारे मुख्यमंत्री असो फडणवीस कायमच चर्चेत आणि प्रकाशझोतात राहिले. फडणवीस यांच्याबद्दल अजून एक कुतूहलाची गोष्ट म्हणजे मुख्यमंत्री म्हणून त्यांना नेमका किती पगार मिळतो? दर महिन्याला मुख्यमंत्री म्हणून काम करणाऱ्याला किती पैसे सरकारी तिजोरीमधून वेतन म्हणून दिले जातात. याबद्दलच सविस्तरपणे आज आपण मुख्यमंत्री फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त जाणून घेऊयात...
महाराष्ट्र हे देशातील सर्वात श्रीमंत राज्य आहे. दरडोई उत्पन्नाचा विचार केला तर महाराष्ट्र हे इतर कोणत्याही राज्यापेक्षा बरेच पुढे आहे. आता असं असताना महाराष्ट्राचे मुख्यमंत्री सर्वाधिक पगार घेतात असं तुम्हाला वाटणं सहाजिक आहे. मात्र तसं नाहीये. सर्वाधिक पगार घेणाऱ्या मुख्यमंत्र्यांच्या यादीत महाराष्ट्र राज्याचा चौथा क्रमांक लागतो. भारतात एकूण 28 राज्य आणि 8 केंद्र शासित प्रदेश आहेत. भारतातील प्रत्येक राज्याच्या मुख्यमंत्र्यांला वेगवेगळं वेतन मिळतं. मुख्यमंत्र्यांना किती पगार द्यावा हे ठरवण्याचा अधिकार प्रत्येक राज्याच्या सरकारला असतो. त्यानुसारच मुख्यमंत्र्यांच्या पगाराची रचना निश्चित केली जाते. मुख्यमंत्र्यांचा पगार हा त्यांच्यावरील जबाबदारी, राज्याचा आवाका आणि काम यावर साधारणपणे अवलंबून असतो. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांच्या पगाराचंही हेच सूत्र आहे.
नक्की वाचा >> Birthday Special: फडणवीसांपेक्षा मिसेस CM अधिक श्रीमंत; दोघांची एकूण संपत्ती किती पाहिलं का?
'मुख्यमंत्री आणि मंत्र्यांचे वेतन आणि फायदे 1956' च्या भत्ता कायद्याद्वारे महाराष्ट्रात मुख्यमंत्र्यांचं वेतन निश्चित करुन ते नियंत्रित केले जातं. या कायद्यानुसार मुख्यमंत्री आणि मंत्र्यांचे वेतन राज्याच्या मुख्य सचिवांना देण्यात येणाऱ्या मूळ वेतन आणि महागाई भत्त्याशी जुळणारं असतं हे निश्चित केलं जातं होते. मूळ वेतनाव्यतिरिक्त, मुख्यमंत्र्यांना अनेक भत्ते आणि अतिरिक्त विशेषाधिकार प्राप्त असतात. मुख्यमंत्र्यांना अधिकृत खर्च भागवण्यासाठी वार्षिक 10 लाख रुपयांचा अतिरिक्त भत्ता मिळू शकतो. त्यासाठी मुख्यमंत्रिपदावरील व्यक्ती पात्र असते. याव्यतिरिक्त, मुख्यमंत्र्यांच्या सहाय्यकासाठी दरमहिन्याला 25 हजार रुपयांचं वाटप केले जातात. मुख्यमंत्र्यांचे कार्यालय आणि जबाबदाऱ्या सुरळीतपणे पार पाडण्यासाठी इतर विविध भत्तेही वेळोवेळी दिले जातात.
नक्की वाचा >> श्रीमंतीतही अजित'दादा'च... फडणवीसांपेक्षा अजित पवारांकडे सहापट अधिक पैसा; एकूण संपत्ती...
मुख्यमंत्र्यांना नेमका पगार किती दिला जातो? असा प्रश्न तुम्हाला पडला असेल तर बदलत्या आर्थिक परिस्थितीनुसार इतर अनेक गोष्टी लक्षात घेत मुख्यमंत्र्यांच्या वेतन रचनेत वेळोवेळी सुधारणा केली जाते, हे लक्षात घेतलं पाहिजे. सध्या, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दर महिन्याला 3 लाख 40 हजार रुपये वेतन दिले जाते. म्हणजेच दर वर्षाला फडणवीस यांना 40 लाख 80 हजार रुपये केवळ वेतन म्हणून मिळतात.