Ashish Shelar Slams Raj Thackeray: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरेंनी शनिवारी वरळी डोममधील विजय मेळाव्यामध्ये सत्ताधाऱ्यांवर भाषा त्रिसूत्रीच्या मुद्द्यावरुन कठोर शब्दांमध्ये निशाणा साधला. राज ठाकरेंनी उद्धव ठाकरेंसोबत आज मी एकत्र आलो यासाठी फडणवीसांचे आभार मानतो असं म्हणताना जे बाळासाहेबांना जमलं नाही ते फडणवीसांना करुन दाखवलं, असा टोलाही हिंदी भाषेच्या सक्तीचा संदर्भ देताना लगावला. ठाकरेंनी केलेल्या टीकेतील एका वाक्यावरुन भारतीय जनता पार्टीचे मुंबईचे अध्यक्ष आशिष शेलार चांगलेच खवळल्याचं आज दिसून आलं. पत्रकारांशी बोलताना आशिष शेलार यांना राज यांच्या एका विधानावरुन प्रश्न विचारण्यात आला असता त्यांनी खोचक शब्दांमध्ये तो प्रश्न उडवून लावला.
शनिवारी आपल्या भाषणामध्ये राज ठाकरेंनी, "कोणताही झेंडा नाही, मराठी हाच अजेंडा! हे मी आधीच स्पष्ट केलं होतं," असं म्हटलं. पुढे बोलताना राज यांनी, "माझ्या मराठीकडे, महाराष्ट्राकडे वेड्यावाडक्या नजरेनं कोणी पाहायचं नाही," असा इशारा दिला. तसेच हिंदी सक्तीचा मुद्दा गरजेचा नव्हता असं म्हणताना त्यांनी सत्ताधाऱ्यांना लक्ष्य केलं. "खरं तर हा प्रश्न अनठायी होता. काही गरजच नव्हती. अचानक हिंदीचं आलं कुठून कळलं नाही मला. हिंदी कशासाठी? कोणासाठी हिंदी? लहान मुलांवर जबरदस्ती करताय. कोणाला काही विचारायचं नाही. आमची सत्ता, बहुमत आम्ही लादणार," असं म्हणत सत्ताधाऱ्यांना सुनावलं.
"तुमच्या हातात सत्ता असेल ती विधानभवनात! आमच्याकडे सत्ता आहे रस्त्यावर," असं राज यांनी भाषणात म्हणताच उपस्थितांनी टाळ्यांचा कडकडाट केला. "एक पत्र लिहिलं, दोन पत्र लिहिली. नंतर ते दादा भुसे माझ्याकडे आले. आम्ही काय म्हणतोय एवढं समजून तर घ्या. एवढं काय म्हणतोय ऐकून तर घ्या. तुम्ही सांगताय ते ऐकून घेईन पण ऐकणार नाही. मराठीच्या विषयात तुम्ही तिसरी भाषा लादत आहात. कुठलं त्रिभाषा सूत्र जेव्हा आलं ते केवळ सेंट्रल गव्हर्मेंट आणि राज्य सरकारमधील संवादासाठी आणलं," अशी आठवण राज यांनी करुन दिली.
नक्की वाचा >> 'भाजपावाल्यांना लाज...', मनसैनिकांची पहलगाम दहशतवाद्यांशी तुलना करणाऱ्या शेलारांना उत्तर; 'ज्या महाराष्ट्राने..'
राज ठाकरेंनी आमची सत्ता रस्त्यावर असल्याचं म्हटल्यासंदर्भात पत्रकारांनी आशिष शेलार यांना विचारलं असता त्यांनी खोचक उत्तर देश प्रश्न उडवून लावला. "मराठी माणसाच्या अस्मितेची चिंता भाजपाच करेल. अमराठी माणसावरील अन्याय भाजपा खपवून घेणार नाही," असं आशिष शेलार म्हणाले. त्यानंतर शेलार यांना राज ठाकरेंनी तुमची सत्ता विधानसभेत असेल तर आमची रस्त्यावर आहे असं म्हटलंय असं सांगत प्रतिक्रिया विचारली. मात्र राज यांच्या तोंडचं हे वाक्य पत्रकाराने सांगताच आशिष शेलार यांनी, दुसरीकडे पाहत हातवारे करुन, "...मग रस्त्यावर गोट्या खेळा!" असा सल्ला राज ठाकरेंना दिला. या माध्यमातून आशिष शेलार यांनी त्यांचे चांगले मित्र असलेल्या राज ठाकरेंनाच डिवचल्याचं दिसून येत आहे.