Marathi News> महाराष्ट्र बातम्या
Advertisement

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरेंविरोधात आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्या या पक्षाच्या कार्यकर्त्याला अटक

सार्वजनिक पदांवर असलेल्या आणि प्रख्यात राजकीय व्यक्तिमत्त्वाच्या लोकांच्या प्रतिष्ठेला जाणीवपूर्वक इजा पोहचवण्याचे काम हा आरोपी करत आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरेंविरोधात आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्या या पक्षाच्या कार्यकर्त्याला अटक

मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांच्या विरोधात फेसबुकवर आक्षेपार्ह गोष्टी पोस्ट केल्याप्रकरणी पोलिसांनी एका भाजप कार्यकर्त्याला अटक केली आहे आणि त्याच्याविरूद्ध पुणे विमानतळ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राजेंद्र पंढरीनाथ काकडे असे अटक केलेल्या व्यक्तीचे नाव आहे. याप्रकरणी लोहगाव भागातील रहिवासी आनंद रामनिवास गोयल यांनी फिर्याद दिली होती. त्यानंतर पुणे विमानतळ पोलिसांनी कारवाई करत राजेंद्र काकडे यांना अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांच्याविरोधात फेसबुकवर काकडे यांनी 7 मे रोजी एक आक्षेपार्ह भाष्य करत पोस्ट केली होती. त्याविरोधात आनंद गोयल यांनी तक्रार दाखल केली होती. आरोपी राजेंद्रचे स्टेशनरीचे दुकान आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सार्वजनिक पदांवर असलेल्या आणि प्रख्यात राजकीय व्यक्तिमत्त्वाच्या लोकांच्या प्रतिष्ठेला जाणीवपूर्वक इजा पोहचवण्याचे काम हा आरोपी करत आहे. त्यामुळे त्याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी विमानतळ पोलिसांचा तपास सुरू आहे.

पंतप्रधान मोदी आणि मुख्यमंत्री योगी यांचीही बदनामी करण्याचा प्रयत्न

यापूर्वी सायबर पोलिसांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या फोटोला आक्षेपार्ह पद्धतीने बदनाम केल्याप्रकरणी राष्ट्रवादी कँग्रेसचे युवक सचिव मोहसीन शेख आणि स्वाभिमानी लोहार समाज संघटनेचे संस्थापक अध्यक्ष शिवाजीराव जावीर यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला होता. या प्रकरणात भाजपचे पुणे शहरातील सोशल मीडिया संयोजक विनीत वाजपेयी यांनी सायबर पोलिसांत तक्रार दाखल केली होती.

शरद पवारांवर आक्षेपार्ह पोस्ट आणि जीवे मारण्याची धमकी

27 मार्च ते 7 एप्रिल दरम्यान सोशल मीडियावर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची बदनामी केल्याप्रकरणी काही लोकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी बनावट फेसबुक पेज आणि अकाउंट तयार केले होते. त्याचबरोबर ट्वीटर अकाउंट्स आणि इतर सोशल मीडिया माध्यमातून शरद पवारांवर अत्यंत विकृत भाष्य केले होते आणि शरद पवार यांना जिवे मारण्याची धमकीही दिली होती.

Read More