Marathi News> महाराष्ट्र बातम्या
Advertisement

एक बटण दाबेन देशात खळबळ उडवून देईन; महाराष्ट्राच्या राजकारणात प्रफुल्ल लोढाच्या रुपानं नवं वादळ

'एक बटण दाबेन देशात खळबळ उडवून देईन'. प्रफुल्ल लोढाच्या धमकीचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.  लोढा महाजनांचा कार्यकर्ता असल्याचा आरोप आहे. गिरीश महाजनांनी लोढाबाबतचे आरोप फेटाळले आहेत. 

  एक बटण दाबेन देशात खळबळ उडवून देईन; महाराष्ट्राच्या  राजकारणात प्रफुल्ल लोढाच्या रुपानं नवं वादळ

Praful Lodha : महाराष्ट्राच्या राजकारणात प्रफुल्ल लोढाच्या रुपानं नवं वादळ येण्याची शक्यता आहे. पोक्सोच्या गुन्ह्यात अटक झालेल्या प्रफुल्ल लोढानं वर्षभरापूर्वी गिरीश महाजनांना एक बटण दाबेन तर देशात खळबळ माजेल अशी धमकी दिली होती. त्या प्रफुल्ल लोढाकडं असं कोणतं बटण आहे की ज्यामुळं देशात खळबळ माजेल अशी चर्चा सुरु झाली आहे. दुसरीकडं एकनाथ खडसे आणि संजय राऊत यांनी प्रफुल्ल लोढा हा गिरीश महाजनांचा राजदार असल्याचा आरोप केला आहे. 

हा प्रफुल्ल लोढा तोच माणूस आहे जो आता भाजपचा कार्यकर्ता म्हणून मिरवतो. वर्षभरापूर्वी हाच प्रफुल्ल लोढा गिरीश महाजन आणि रामेश्वर नाईककडून धोका असल्याचा आरोप करत होता. प्रफुल्ल लोढाचा तो व्हिडिओ पुन्हा व्हायरल झालाय. या व्हिडिओत प्रफुल्ल लोढा जामनेर पोलीस ठाण्यात तक्रार केल्याचं सांगतो. प्रफुल्ल लोढा एवढ्यावरच थांबला नाही. पुरावे मागणा-या मंत्री गिरीश महाजनांनाना त्यानं एक बटण दाबेन आणि काय होईल ते तुम्ही पाहा असा थेट इशाराच दिला आहे.

प्रफुल्ल लोढा याच्याकडच्या बटणाची माहिती शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षापर्यंतही पोहोचलीये. संजय राऊत यांनीही लोढाच्या बटणाचा आवर्जून उल्लेख केला आहे. हा प्रफुल्ल लोढा सामान्य कार्यकर्ता होता. पण जेव्हापासून गिरीश महाजनांच्या तो जवळ गेला तेव्हापासून त्याचा आर्थिक उत्कर्ष झाल्याचा आरोप जळगावमधीलच नेते एकनाथ खडसेंनी केला आहे.
गिरीश महाजनांनी या व्हिडिओवर तातडीनं स्पष्टीकरण दिले. प्रफुल्ल लोढाशी आपला कोणताही संबंध नसल्याचा त्यांनी दावा केलाय. एवढंच नाहीतर त्यांनी प्रफुल्ल लोढाचे शरद पवार, सुप्रिया सुळे आणि उद्धव ठाकरेंसोबतचे फोटो जाहीर केले. 

प्रफुल्ल लोढा आता भाजपचं कमळ हातात घेऊन फिरत असला तरी त्याच्या हातात कोणतं बटण आहे अशी चर्चा आता सुरु झालीय. एक सामान्य कार्यकर्ता असलेला प्रफुल्ल लोढा एका मंत्र्याला धमकी कसा देऊ शकतो अशी चर्चाही आता विरोधकांनी सुरु केलीय. त्यामुळं ते कोणतं बटण प्रफुल्ल लोढा दाबणार होता असं सवाल विचारला जात आहे.

Read More