Marathi News> महाराष्ट्र बातम्या
Advertisement

संजय गायकवाडांच्या मदतीचा बैल शेतकऱ्याच्या अंगावर धावला, मारकुटेपणाची गावभर चर्चा!

Sanjay Gaikwad: मदत नको पण बैल आवर असं म्हणण्याची वेळ लातूरच्या अंबादास पवारांवर आलीये. 

संजय गायकवाडांच्या मदतीचा बैल शेतकऱ्याच्या अंगावर धावला, मारकुटेपणाची गावभर चर्चा!

Sanjay Gaikwad: आमदार निवासातील कॅन्टीनमध्ये मारामारी करणारे आमदार संजय गायकवाड सध्या खूपच चर्चेत आहेत. त्यांच्या मारकुटेपणाची चर्चा सुरु असतानाच लातूरच्या शेतकऱ्याला मदत म्हणून दिलेला बैलही चर्चेत आलाय. कारण लातूरच्या शेतकऱ्याला दिलेल्या बैलजोडीतला एक बैल मारकुटा निघालाय. आता या मारकुट्या बैलासह शेती कशी करायची असा प्रश्न शेतक-याला पडलाय. 

मदत नको पण बैल आवर असं म्हणण्याची वेळ लातूरच्या अंबादास पवारांवर आलीये. त्याला कारणही तसंच झालंय. झी 24 तासच्या बातमीनंतर आमदास संजय गायकवाड यांनी अंबादास पवारांना बैलजोडी भेट म्हणून दिलीय. संजय गायकवाडांनी मनाचा मोठेपणा दाखवत शेतक-याला बांधावर जाऊन बैल भेट दिल खरे. पण हे बैलही आमदार संजय गायकवाडांसारखेच निघाल्याची चर्चा आहे. 

संजय गायकवाडांनी कॅन्टीनमध्ये जशी मारामारी केली तसे ते बैलही मारकुटे निघालेत. दोन बैलांपैकी उजव्या बाजुचा बैल अंबादास पवारांना जवळ येऊही देत नाही. तसा प्रयत्न केल्यास थेट शिंगं मारण्याचा पावित्रा तो बैल घेतो. शेतकरी जवळ गेला, तर बैल पाय मागे घेतो, डोळे वटारतो आणि शिंगं हलवतो. जणू काही समोरच्या व्यक्तीलाच आव्हान देतोय. मदतीत मिळालेला मारकुटा बैल सांभाळण्यासाठी वेगळी माणसं ठेवायची वेळ अंबादास पवारांवर आलीये.

अभिनेता सोनू सुद यानं अंबादास पवारांना थेट बैलजोडी न देता त्यांच्या खात्यावर 45 हजार रुपये पाठवलेत. सोनू सूद यानंही मारकुटे बैल दिले असते तर काय झालं असतं या कल्पनेनंच गावातील शेतक-यांच्या अंगावर शहारा येतो.

ढवळ्या शेजारी पवळ्या बांधला गुण नाही आला पण वाण आला अशी म्हण आहे. इथं तर आमदारांचा मारकुटा स्वभाव खरेदी केलेल्या बैलात उतरला की काय अशी खुमासदार चर्चा लातूरमध्ये सुरु झालीये. औताला जुंपावं तर मारणार. जुंपलं नाही तर शेती कशी करणार अशी अडचण शेतकरी अंबादास पवारांसमोर आहे. आता या मारकुट्या मदतीचं करायचं काय असा यक्षप्रश्न शेतक-यासमोर उभा राहिलाय.

संजय गायकवाडांचे 8 वाद!

छत्रपती संभाजी महाराजांनी 16 भाषा शिकल्या मग ते मूर्ख होते का? अशा आशयाचे वक्तव्य संजय गायकवाडांनी केले होते. यामुळे महापुरुषांचा अपमान झाल्याचा आरोप होऊन मोठा वाद निर्माण झाला होता. राहुल गांधींची जीभ कापणाऱ्याला 11 लाख बक्षीस देण्याची घोषणा केली. यामुळे देशभरातून तीव्र प्रतिक्रिया उमटल्या आणि त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी झाली. फक्त दारू-मटण अन् दोन हजारात विकले भाडXX साले, यांच्यापेक्षा रांX बऱ्या" असे मतदारांबद्दल आक्षेपार्ह शब्द वापरले. या वक्तव्याचा व्हिडिओ व्हायरल होऊन त्यांच्यावर जोरदार टीका झाली.महाराष्ट्र पोलिसांना "अकार्यक्षम खातं" म्हटले आणि त्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केले. गृहमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही नाराजी व्यक्त करत ताकीद दिली. एका पोलीस कर्मचाऱ्याला आपली गाडी धुवायला लावल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला, ज्यामुळे पोलिसांच्या गैरवापराचा आरोप झाला."सरकारने कर्जमाफी दिली नाही, तर शेतकऱ्यांनी बँकांच्या दारात जाऊन मारामारी केली तरी चालेल" असे वक्तव्य केले. यामुळे शेतकऱ्यांना हिंसक मार्गासाठी प्रोत्साहन दिल्याचा आरोप झाला.भाजपचे माजी आमदार विजयराज शिंदे यांच्या बंडखोरीवर "विजयराज शिंदे ही चिल्लर केस, त्याच्या बापात दम असेल तर..." असे आक्षेपार्ह विधान केले.संजय गायकावाडांनी आमदार निवासातील कॅन्टीन कर्मचाऱ्याला मारहाण केली. जेवणातील डाळ खराब झाल्याचं लक्षात आलं ज्यामुळं त्यांनी कॅन्टीन चालकाला जाब विचारला. त्याच्याकडून व्यवस्थित उत्तर मिळत नसल्याचं पाहून गायकवाडांनी त्याच्यावर हात उगारला. आमदार किंवा त्यांच्या सहकाऱ्यांना आमदार निवासातील कॅन्टीनमध्ये देण्यात येणाऱ्या जेवणाचा दर्जा इतका निकृष्ट असल्याची शहानिशा झाल्यानंतर गायकवाड यांनी तीव्र शब्दांत संताप व्यक्त केला आणि त्यासंर्भात अन्न व प्रशासन विभागाकडेही यासंदर्भातील, कॅन्टीन चालकाची तक्रार करण्यात येणार असल्याचं सांगितलं. 

सतत चर्चेत राहण्याची वृत्ती

आक्रमक आणि बेधडक शैलीमुळे आमदार संजय गायकवाड सतत प्रसारमाध्यमांमध्ये चर्चेत राहतात.अनेकदा त्यांच्या वक्तव्यांमुळे पक्ष आणि सरकारलाही अडचणींचा सामना करावा लागतो. या सर्व घटनांमधून संजय गायकवाड हे त्यांच्या बेधडक वक्तव्यांमुळे आणि त्यातून निर्माण होणाऱ्या वादांमुळे नेहमीच चर्चेत राहिले आहेत हे स्पष्ट होते.

Read More