पुणे : दृष्टीहीन व्यक्तींना स्पर्श ज्ञान अफाट असतं असं म्हणतात. आणि याच स्पर्शज्ञानाच्या जोरावर दृष्टीहीन महिला अनेक महिलांचे प्राण वाचवतायेत. पण पुण्यातील एक महिला डॉक्टर ब्रेस्ट म्हणजे स्तनाच्या कॅन्सरचे निदान करण्यासाठी दृष्टीहीन मुलींना प्रशिक्षित करतायेत. डॉक्टर आरती शिराळी यांच्या अभिनव उपक्रमाबाबत जाणून घेऊयात.
डॉक्टर आरती शिराळी या स्वत: ब्रेस्ट कॅन्सर सर्जन आहेत. अबूधाबीच्या एका मोठ्या रूग्णालयात महिन्याला लाखो रूपयांच्या कमाईवर पाणी सोडून त्या सध्या दृष्टीहीन मुलींना सोबत घेवून राज्यात ठिकठिकाणी निशुल्क कॅम्प भरवतात. महिलांमध्ये ब्रेस्ट म्हणजे स्तनाच्या कॅन्सरचे वेळेत निदान आणि उपचार होत नसल्याने मृत्यूंचे प्रमाणही वाढतंय. हीच उणीव लक्षात घेवून त्यांनी पुण्यात ट्रस्ट इन पिंक फाऊंडेशनच्या माध्यमातून स्पर्श वरदान नावाचा कार्यक्रम हाती घेतलाय. परंतु स्तनाच्या कॅन्सरचे निदान करण्यासाठी अस्तित्वातील पर्याय खूपच महागडा होता. म्हणून त्यांनी संशोधनाअंती दृष्टीहीन मुलींच्या स्पर्शज्ञानाचा उपयोग करून घेण्याचे ठरवले आणि त्यांना स्तनाच्या कॅन्सरची गाठ ओळण्यासाठी शास्त्रशुद्ध प्रशिक्षण दिले. आता या दृष्टीहीन मुली यात पारंगत झाल्या आहेत. अगदी छोटीशी गाठही त्या आता ओळखतात.
देशात कॅन्सर झालेल्या ४ महिलांपैकी एक महिला ही स्तनाचा कॅन्सर झालेली असते. त्यात बदलत्या जीवनशैलीमुळं तरूणींमध्ये हे प्रमाण वाढताना दिसतंय. म्हणून या संस्थेद्वारे शाळा,कॉलेजमध्ये अधिकतर निशुल्क कॅम्प भरवून तपासणी आणि याविषयी जागरूकता केली जातंय. आतापर्यंत या दृष्टीहीन मुलींनी 10 हजार महिला,मुली यांची तपासणी केली असून 100 महिलांना स्तनाच्या कॅन्सर असल्याचे निदान केलंय. सरकारने या स्पर्श वरदान कार्यक्रमाला मदत केल्यास दृष्टीहीन मुलींना रोजगार तर उपलब्ध होईलच शिवाय सर्व महिलांची तपासणीही शक्य होईल.