Car Dash Camera Video: मुंबई – पुणे द्रुतगती मार्गावर खोपोलीजवळ 26 जुलै रोजी झालेल्या भीषण अपघातासंदर्भातील एक धक्कादायक व्हिडीओ समोर आला आहे. हा अपघात ज्या ट्रेलरमुळे झाला त्या ट्रेलरचा ब्रेक फेल झाल्यानंतर नेमकं काय घडलं हे याच मार्गावरुन त्या ट्रेलरच्या मागे प्रवास करत असलेल्या कारच्या डॅश कॅमेरामध्ये कैद झालं आहे. एका जणाच्या मृत्यूसाठी कारणीभूत ठरलेल्या या अपघातामध्ये 25 जण गंभीर जखमी झाले आहेत. खंडाळा घाटात झालेल्या या अपघातामध्ये मुंबईच्या दिशेने येणाऱ्या ट्रेलरने 15 ते 16 वाहनांना जोरदार धडक दिली. पण ही अपघातांची मालिका नेमकी कशी सुरु झाली हे आता व्हिडीओमधून समोर आलं आहे.
पुण्याकडून मुंबईच्या दिशेने येणाऱ्या ट्रेलरचे खंडाळा घाटात तीव्र उतारावर या ट्रेलरचा ब्रेक निकामी झाला. ब्रेक निकामी झाल्याने चालकाचे ट्रेलरवरील नियंत्रण सुटले व तो समोरील वाहनांना धडक देत तसाच पुढे जात राहिला. ट्रेलरचा ब्रेक फेल झाल्यानंतर ट्रेलर रस्त्याच्या अगदी उजवीच्या लेनमधून डावीकडील लेनमध्ये आला.
ट्रेलरला नियंत्रित करण्याच्या नादात रस्त्याच्याकडेला असलेला विजेचा खांब उडवला. मात्र या धडकेनंतर ट्रेलर पुन्हा डावीकडून उजवीकडेच्या लेनमध्ये वळला आणि गाड्यांना धडक देत सुसाट चालत होता. या अपघाताचा डॅश कॅम व्हिडीओ आता समोर आला असून नेमकी या अपघाताला सुरुवात कशी झाली ते या व्हिडीओत दिसत आहे.
ExpresswayAccident | एक्स्प्रेस वे वरील 'त्या' अपघाताचा थरार, कारच्या डॅशकॅममध्ये कैद#expresswayaccident #accident #Zee24Taas pic.twitter.com/sVH6JO0MbY
— ZEE २४ तास (@zee24taasnews) July 28, 2025
दिड ते दोन किलोमीटरच्या पट्ट्यात या ट्रेलरने एकामागून एक वाहनांना धडक दिली. या अपघातामध्ये लहान वाहनांचे प्रचंड नुकसान झाले. दुपारी दोनच्या सुमारास हा अपघात झाला. यामुळे पुण्याहून मुंबईला येणारी वाहतूक ठप्प झाली. अपघाताची माहिती मिळताच स्थानिक बचाव पथके, पोलीस यंत्रणा घटनास्थळी दाखल झाले.
बचाव पथकांनी अपघातग्रस्त वाहनांमधील जखमींना बाहेर काढून खोपोली आणि पनवेलमधील रुग्णालयात दाखल केले. या अपघातात एका महिला प्रवाशाचा मृत्यू झाला असून 20 ते 25 प्रवाशांना खोपोली येथील नगरपालिकेच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. अनेकांना डिस्चार्ज देण्यात आला असून रुग्णालयात दाखल असलेल्यांची प्रकृती स्थिर असल्याचं सांगण्यात आलं आहे.