Marathi News> महाराष्ट्र बातम्या
Advertisement

देवीच्या लग्नाचे वऱ्हाडी बनले दगड? 'चौंडाळा' गावाने 500 वर्षांपासून नाही पाहिल लग्न

देवीच्या लग्नासाठी आलेलं वऱ्हाड दगड बनून गावाबाहेर आजही आहेत. काय आहे या मागची आख्यायिका. 

देवीच्या लग्नाचे वऱ्हाडी बनले दगड? 'चौंडाळा' गावाने 500 वर्षांपासून नाही पाहिल लग्न

विशाल करोळे, झी 24 तास छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातलं हे चौंडाळा गाव. चौंडाळा गाव राज्यातल्या इतर गावांसारखंच गाव आहे. पण या गावानं गेल्या पाचशे वर्षांपासून लग्न पाहिलेलं नाही. गावात दिडशे ते दोनशे घरं आहेत. पण यातल्या एकाही घरासमोर गेल्या पाचशे वर्षांत लग्नाचा मांडव लागलेला नाही. यातल्या एकाही घरासमोर नवरा-नवरीच्या अंगावर अक्षता पडल्या नाहीत. गावानं वर्षांनुवर्षांपासून गावात मंगलअष्टकांचे सूर कुणीही ऐकलेले नाहीत. हे जगावेगळं गाव असं कसं? या गावातले लोकं त्यांच्या घरातील मुलामुलींची लग्न गावात का करत नाहीत? अशी कोणती गोष्ट आहे ज्यामुळं गावात लग्न लागत नाही?

ज्या गावात लग्नच लागलेली नाहीत त्या गावाची लोकसंख्या वाढली कशी? गावचा गावगाडा चालला कसा असे एक ना अनेक प्रश्न आम्हाला पडले. आम्ही थेट चौंडाळा गाव गाठायचं ठरवलं. चौंडाळा गाव छत्रपती संभाजीनगर शहरापासून जवळपास 60 ते 65 किलोमीटर अंतरावरचं गाव.  झी 24 तासची टीम चौंडाळा गावात पोहचली. चौंडाळा गाव इतर सामान्य गावांसारखं आहे. लग्नाचा सीझन असतानाही गावात कोणत्याही घरासमोर लग्नाचा मंडप दिसला नाही. गावात कुणाचंही लग्न लागत नाही याचं कारण आहे गावातलं रेणुकादेवीच मंदिर.
रेणुकादेवीचं गावात पुरातन मंदिर आहे. रेणुकामातेचं चौंडाळा गावातील मंदिर प्रतिमाहूर म्हणून ओळखलं जातं. ज्या भाविकाला माहूरला रेणुकामातेच्या दर्शनाला जाता येत नाही ते भाविक चौंडाळाच्या रेणुकामातेचं दर्शन घेतात.

रेणुकामातेच्या या मंदिराला जवळपास 400 ते 500 वर्षांचा इतिहास आहे. या मंदिराचा जीर्णोध्दार अहिल्यादेवी होळकरांनी केल्याचं गावकरी सांगतात. पण त्याचे ऐतिहासिक पुरावे मात्र सापडत नाहीत. गावातल्या या मंदिराबाबत अनेक वेगवेगळ्या अख्यायिकाही गावकरी सांगतात.

मंदिर अतिशय साधं आहे रेणुकामातेची हुबेहुब मूर्ती इथं पाहायला मिळते. मंदिराचा सभामंडप दगडी खांबांवर टीकून आहे. मंदिरासमोरील दीपमाळ मंदिरापेक्षा बरीच मोठी आहे. मंदिराचे दगडी खांब रंगवलेले असले तरी ते मंदिर किती पुरातन आहे याची साक्ष देतात. गावातील रेणुकामातेच्या मंदिरामुळं चौंडाळा गावात गेल्या पाचशे वर्षांपासून लग्न झालेलं नसल्याचं सांगण्यात येतंय. याला एक अख्यायिका आहे. पुरातन काळात रेणुकामातेचं लग्न ठरलं. लग्नाचं व-हाड गावाबाहेर आलं.पण देवीला ते लग्न मान्य नव्हतं. त्यामुळं देवीचा कोप झाला. देवीच्या लग्नासाठी आलेलं व-हाड दगड बनून राहिलं. तेव्हापासून गावात कुणाच्याही घरी लग्न लागत नसल्याचं गावकरी सांगतात. आजही गावाबाहेर ते दगड दिसतात. या दगडांचा कोणीही बांधकामासाठी वापर करत नाही.

तेव्हापासून गावात अजून एकही लग्न लागलेलं नाही. गावातल्या एकाही घरासमोर लग्नाचा मंडप पडलेला नाही की गावात मंगलाष्टकं ऐकू आली नाहीत... गावातल्या मुलामुलींची गावात लग्न लावली जात नाही.. लग्न लावलं की त्या लग्नात विघ्न येतं अशी अख्यायिका आहे. गेल्या चारशे वर्षांत गावातले लोक लग्न करतात पण ते गावाबाहेर जाऊन. नवरा-नवरीच्या डोक्यावर अक्षता गावाबाहेरच पडतात...

गावात लग्न करता येत नाही म्हटल्यावर गावक-यांनीही यावर उपाय शोधून काढला. गावापासून दोन ते तीन किलोमीटर अंतरावर हनुमानाचं मंदिर आहे. त्या बजरंगबलीसमोर गावातील लग्न लागतात. तिथंच नवरा नवरीच्या अंगावर अक्षता पडतात आणि मंगलाष्टकं म्हटली जातात. लग्नाचे सगळे विधी गावात होतात. पण लग्नासाठी प्रत्येक गावक-याला गावापासून दोन किलोमीटर अंतरावरच्या हनुमान मंदिरात जावं लागतं. गावातील अनेक पिढ्यांनी गावात लग्न झालेलं पाहिलंच नाही.

fallbacks

कधीकाळी त्या हनुमान मंदिराजवळ एक गाव होतं असं सांगतात. शिराळा असं त्या गावाचं नाव होतं. त्या गावाला कसला तरी शाप मिळाला. त्यामुळं ते गाव उद्ध्वस्त झालं. त्या गावात एकही घर उरलं नाही. ते गाव अचानक उजाड झालं. त्या गावात राहिलं फक्त मारुतीचं मंदिर.... 

रेणुका देवीच्या मंदिराजवळ वस्ती नव्हती... कालांतरानं मंदिराजवळ हळूहळू गाव वसलं. साधारणपणे आधी वस्ती तयार होते मग गाव तयार होतं. पण चौंडाळा गावाबाबत वेगळी अख्यायिका आहे. इथं आधी मंदिर उभं राहिलं मग त्याच्याशेजारी गाव वसल्याचं सांगण्यात येतं.

गावापासून दोन किलोमीटरवरचा मारुती एकलकोंडा राहू नये म्हणून गावातल्या काही लोकांनी गावात मंदिर बांधून मारुतीला गावात आणण्याचा विचार केला. मंदिर बांधायला सुरुवातही केली. पण गावातलं ते हनुमानाचं मंदिर कधी पूर्ण झालंच नाही.

गावातल्या काही लोकांनी गावात लग्न लावण्याचा प्रयत्न केला होता. पण त्या प्रयत्नाला कधीही यश आलं नाही. गावातले लोकं आजही ही श्रद्धा कायम ठेवण्याच्या प्रयत्नात आहेत. परंपरा आहे ती परंपरा आपण पुढं न्यायची असं गावक-यांना वाटतं. गावात लग्न करायचं नाही हा पूर्वजांनी घालून दिलेला नियम आहे तो मोडाचा नाही असं गावक-यांचं म्हणणं आहे.

चौंडाळा गावातील या प्रथा इथपर्यंत सीमित नाहीत. चौंडाळा गावात तुम्ही आल्यावर या गावात तुम्हाला आणखी एक गोष्ट खटकल्याशिवाय राहणार नाही. रेणुकामातेच्या मंदिरापेक्षा गावात कोणत्याही घराची उंची मंदिरापेक्षा जास्त नाही. गावात दीडशे ते दोनशे घरं आहेत. पण एकाही घराची उंची मंदिरापेक्षा जास्त नाही. मंदिरापेक्षा उंच घर बांधायचं नाही, बांधल्यास त्या घरात सुखसमाधान नांदत नाही असा गावक-यांचा समज आहे.

 मंदिराच्या परिसरात सगळी घरं मंदिरापेक्षा दोन बोट कमी उंचीची तुम्हाला दिसतील .मंदिराची उंची हिच गावक-यांसाठी लक्ष्मणरेषा आहे. मंदिराजवळची दिपमाळ तेवढंच गावात सर्वात उंचीचं बांधकाम आहे. मंदिरापेक्षा उंच घर बांधलं तर ते टिकत नाही. कुणीतरी केलेला प्रयत्नही त्यांच्या अंगाशी येतो असं गावकरी आवर्जून सांगतात.

रेणुकामातेच्या मंदिरातील पुजा-यांना गावक-यांची ही श्रद्धा मान्य नाही. मुळात गाव ज्या ठिकाणी वसलंय तो भाग खडकाळ आहे. खळकाळ भागात घराचा पाया खोल खोदता येत नाही. पाया खोल नसल्यानं घरही उंच बांधता येत नाही असा दावा तिथले पुजारी करतात.

गावातली श्रद्धा एवढ्यावरच थांबत नाहीत. गावात कोणत्याही घरात पलंग वापरला जात नाही. गावातला प्रत्येक माणूस जमिनीवरच झोपतो...गावात तुम्ही कोणत्याही घरात जा तुम्हाला गावात पलंग, सोफा दिसणार नाही. साधी खाटही गावात नाही. एवढंच नाहीतर बाळंतीणीलाही जमिनीवर झोपवलं जातं. गावात झोपण्यासाठी कोणी ओटाही बांधत नाही.

रेणुकामातेचं मंदिर दुमजली होतं. त्यामुळं गावात दुमजली घर नाही. नवरात्रात रेणुकामाता मंचकी निद्रेत जाते. त्यामुळं गावात कोणीही पलंग वापरत नाही. महाराष्ट्रात चांद्यापासून बांद्यापर्यंत हजारो गावं आहेत. पण लग्न न पाहिलेलं चौंडाळा हे गाव आगळंवेगळंच गाव. शतकानुशतकांपासून या गावातल्या रुढी परंपरा गावक-यांनी जोपासल्यात. गावाच्या वेशीत लग्न लावलं तर काहीच होणार नाही हे विज्ञानवादी गावक-यांना माहिती आहे. पण गावक-यांनी देवीवरच्या श्रद्धेमुळं ती परंपरा आजही जोपासलीये. या श्रद्धेमुळंच हे चौंडाळा जगावेगळं ठरलं आहे. 

Read More