Marathi News> महाराष्ट्र बातम्या
Advertisement

'मूळ शिवसेना ही...'; राज- उद्धव मेळाव्यावर भुजबळ स्पष्टच बोलले, वेळ सांगेल...

Shivsena MNS Vijayi Melava Raj Thackeray Uddhav Thackeray : ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्यानंतर राजकीय वर्तुळातून यावर प्रतिक्रिया येण्यास सुरुवात झाली, ज्यामध्ये छगन भुजबळ यांनीसुद्धा आपलं मत मांडलं.

'मूळ शिवसेना ही...'; राज- उद्धव मेळाव्यावर भुजबळ स्पष्टच बोलले, वेळ सांगेल...

सागर गायकवाड, झी मीडिया, नाशिक : महाराष्ट्राच्या राजकारणातील अतिशय महत्त्वपूर्ण घडामोड सध्या राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरली असून ही घडामोड म्हणजे ठाकरेंचा विजयी मेळावा. मराठी भाषेच्या मुद्द्यावरून तब्बल दोन दशकांनंतर पहिल्यांदाच राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एका मंचावर दिसले आणि समर्थकांनी एकच जल्लोष केला. फक्त शिवसेना (UBT) आणि मनसेच नव्हे, तर इतर पक्षाच्या नेत्यांनीसुद्धा या मेळाव्याला हजेरी लावल ठाकरे बंधूंना समर्थन दिलं. अशा या परिस्थितीमध्ये सत्ताधाऱ्यांच्या गटातूनही काही प्रतिक्रियांनी लक्ष वेधलं. (Shivsena MNS Vijayi Melava Raj Thackeray Uddhav Thackeray)

अशीच एक प्रतिक्रिया ठरली सामाजिक न्याय व विकास मंत्री छगन भुजबळ यांची. शिवसेनेच्या स्थानपनेकडेच लक्ष वेधलं आणि या मेळाव्याला आपल्या शुभेच्छा दिल्या. झालेला मेळावा आणि ही राजकीय घडामोड पाहता हे स्वाभाविक असल्याचं म्हणत मूळ शिवसेना मराठी मुद्द्यावर जन्माला आली, असं भुजबळ म्हणाले. 

'मराठीच्याच मुद्द्यावर आज राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांचा मेळावा होत असून मनसैनिक आणि शिवसैनिक एकत्र यावेत ही अनेकांचीच इच्छा आहे. किंबहुना आम्हालासुध्दा असे वाटत की ते एकत्र यावे पण अस होणार आहे का?', असा सूरही त्यांनी आळवला. 

ठाकरे बंधू एका कार्यक्रमासाठी एकत्र आले आहेत, मात्र निवडणुकांसाठी ते एकत्र येथील का नाही याची मला काही कल्पना नसल्याचंही त्यांनी स्पष्ट करत 'एकत्र येणे शक्य आहे का, ते येणारा वेळ सांगेल', असं सूचक वक्तव्य त्यांनी केलं. 

'कुठलेही कुटुंब एकत्र येत असतील तर आनंद आहे'

आमच्या भांडण पेक्षा मराठी मुद्दा जास्त महत्वाचा असल्याचं दोघांनीही सांगितलं असून, मनापासून एकत्रीत येणं हे वेगळं आहे, ज्या मुद्यावर ते वेगळे झाले ते प्रश्न सुटले का? असाही प्रश्न त्यांनी मांडत कदाचित पुढे जाऊन ते प्रश्न सुटतील देखील असा उत्तराचाही सूर आळवला. कोणी कुठलेही कुटुंब एकत्र येत असतील तर आनंद आहे असं म्हणत राजकीय दृष्टीने ते एकत्र येथील का माहिती नाही हाच पुनरुच्चार त्यांनी केला. 

त्रिभाषा सूत्र बाबत अनेक राज्यात अभ्यास सुरू असल्याचं म्हणत यानंतर त्यांनी कांदा आणि हमीभाव याकडे आपला मोर्चा वळवला. कांदा बाबत आम्ही कळवलं असून, वारंवार निर्यात बंद करू नका ही आमची देखील मागणी आहे असं ते म्हणाले. 

सुशील केडिया मुद्द्यावरही भुजबळांनी भाष्य केलं 

'मराठी माणूस ज्या राज्यात गेले आहेत त्या ठिकाणी ते त्या राज्याची भाषा बोलतात. मराठी बोलणारच नाही ही भूमिका काही बरोबर नाही. जे मंडळी मराठी बोलणार नाहीत असे सांगतात ते परदेशी गेल्यावर इंग्रजी बोलतात', असं म्हणत सुशील केडिया मुद्द्यावरही त्यांनी प्रतिक्रिया दिली.  तर, एकनाथ शिंदेंच्या वक्तव्यावर सारवासारव करताना, 'त्यांनी जय महाराष्ट्र देखील म्हटलं,  गुजराती समाजाचा कार्यक्रम होता आणि वातावरण देखील होत त्यामुळे ते म्हणाले असतील' अशा शब्दांत त्यांनी आपला मुद्दा मांडला. 

Read More