Maharashtra Politics : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर नगरविकास विभागाच्या विविध योजनांना मुख्यमंत्र्यांनी चाप लावल्याची माहिती सूत्रांनी दिली. विविध योजनांमधील कामांना मंजुरी देण्यापूर्वी मुख्यमंत्र्यांची मान्यता घेण्याच्या सूचना देण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली. महापालिकांना योजना किंवा निधी वाटप करताना तिन्ही पक्षांना योग्य प्रमाणात निधी आणि योजनांचे वाटप व्हावे यासाठी मुख्यमंत्र्यांनी हा निर्णय घेतल्याचे सांगितले जात आहे. या निर्बंधाच्या माध्यमातून फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या एकाधिकारशाहीवर अंकुश आणल्याची चर्चा मंत्रालयात रंगली आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून शिंदेंची कोंडी केल्याची चर्चा या निमित्तानं सुरु झाली आहे. एकनाथ शिंदेंच्या नगरविकास विभागाच्या उधळपट्टीला फडणवीसांनी चाप लावल्याचं सांगण्यात येतंय. विकासकामांना मंजुरी देण्याआधी मान्यता घेण्याच्या फडणवीसांनी सूचना दिल्याचं बोललं जात आहे. निवडणुकांच्या तोंडावर अन्य पक्षातून शिवसेनेत आलेल्या माजी नगरसेवकांना भरघोस निधी दिल्याची तक्रार आहे. शिवसेनेचं वर्चस्व असलेल्या मनपांवर खास मेहेरनजर ठेवल्याचंही सांगण्यात येतंय. भाजप, राष्ट्रवादीची ताकद असलेल्या मनपांना निधी नसल्याच्या तक्रारी येत होत्या त्यामुळं हा निर्णय घेण्यात आल्याचं बोललं जातंय.
शिवसेनेनं अशा प्रकारच्या निर्बंधांच्या वृत्ताचा इन्कार केलाय. महायुतीच्या तीनही नेत्यांचं एकजुटीनं एकदिलानं काम सुरु असल्याचा दावा शिवसेनेनं केला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतलेल्या निर्णयाचं विरोधकांनी स्वागत केलंय. नगरविकास खात्यात मोठी उधळपट्टी सुरु असल्याचा आरोप शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं केला आहे. एकनाथ शिंदेंच्या खात्यावर असे निर्बंध घातले असतील तर शिंदे स्वस्थ बसणार नाही... येत्या काळात त्या संदर्भात दिल्लीत तक्रारी जाण्याची शक्यता नाकारता येत नाही.