Devendra Fadnavis ON Marathi Controversy : महाराष्ट्रात मराठी भाषाच बोलली गेली पाहिजे, असा आग्रह धरण्यात येत आहे. त्यातून राज्यातील वातावरण पेटलं आहे. एका व्यापाराला मराठी येत नाही म्हणून मारहाण करण्यात आली. त्याच उपमुख्यमंत्री एकनाश शिंदे यांनी जय गुजरातची घोषणा केल्यानंतर विरोधक आक्रमक झाले आहेत. यावर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मराठी बोलण्याबद्दल स्पष्टच सांगितलं आहे. पत्रकारांशी बोलताना त्यांनी अनेक विषयांवर आपले मत स्पष्ट केले आहे.
राज्य सरकारने त्रिभाषाचा जीआर रद्द केल्यानंतर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे 5 जुलैला शनिवारी विजय मेळाव्याचं आयोजन केलं आहे. त्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, त्रिभाषा कमिटीबद्दल पहिलीपासून 12 वी पर्यंत हिंदी सक्तीची करा. कॅबिनेटमध्ये घेणारे ते, कॅबिनेटचा निर्णय करणारे ते, निर्णयावर सही करणारे ते आणि आता विजय मेळावा घेणारेही तेच. मला असं वाटतं मराठी माणसाला हे लक्षात येतंय कोण दुटप्पी आहे. हे त्यांचं दुटप्पी धोरण आहे. आमचा विषय पक्का आहे आम्ही समिती केली आहे. जे मराठी मुलांच्या हिताचं असेल तो निर्णय आमची समिती देईल आणि तो निर्णय आम्ही मान्य करु. कोणाचाही दबाव आम्ही मान्य करणार नाही. या ठिकाणी मराठी मुलांच्या हिताचं जे असेल तेच महाराष्ट्रात होईल. तोच निर्णय विद्यार्थ्यांच्या हिताचा निर्णय आम्ही घेऊ.
मुख्यमंत्री पुढे म्हणाले की, मराठी भाषा येत नाही म्हणून मारहाण करणं हे अतिशय चुकीचं आहे. आम्ही मराठी आहोत, आम्हाला मराठीचा अभिमान आहे आणि महाराष्ट्रात मराठी बोलली गेली पाहिजे, हा आग्रह चुकीचा नाही. पण एखाद्या व्यावसायिकाला मराठी येत नाही म्हणून मारहाण करणं हे पूर्णपणे चुकीचं आहे. उद्या आपले अनेक मराठी भाषिक लोकं वेगवेगळ्या राज्यामध्ये व्यवसाय करतात. त्यातल्या अनेकांना तिथली भाषा येत नाही. मग त्यांच्याशी पण अशीच वागणूक होईल का?, असा प्रश्न त्यांनी विचारला. ते पुढे म्हणाले की, भारतामध्ये अशाप्रकारची वागणूक आणि गुंडशाही ही योग्य नाहीय. जर अशा प्रकारची गुंडशाही केली तर त्याच्यावर योग्य कारवाई ही केली जाईल. जर मराठीचा एवढा अभिमान असेल तर मराठी शिकवा. मराठी शिकवणी सुरु करा. एवंढ असेल तर मुलांना मराठी शाळेत टाका. मग तुम्ही मुलांना अशा शाळेत का टाकता जिथे मराठी ही तिसरी भाषा असेल. हे एकीकडे तुम्हाला चालत आणि दुसरीकडे तुम्ही व्यापाऱ्याला मारता, हे किती योग्य आहे?
त्यावर पत्रकारांशी बोलताना मुख्यमंत्री म्हणाले की, मी तुम्हाला आठवण करुन देतो की, चिकोडीला छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याच उद्घाटन करताना माननिय शरद पवार साहेब हे जय महाराष्ट्र आणि जय कर्नाटक म्हणालेत. याचा अर्थ काय त्यांचं कर्नाटकावर जास्त प्रेम आहे आणि महाराष्ट्रावर प्रेम नाही, असं समजायचं का? आपण ज्या लोकांच्या कार्यक्रमाला जातो, त्यावेळी त्यासंदर्भात आपण बोलत असतो. आता गुजराती समाजाच्या कार्यक्रमात गेल्यानंतर जय गुजरात म्हटलं म्हणजे एकनाथ शिंदेंचं गुजरातवर प्रेम आहे आणि मराठीवरच, महाराष्ट्रावरील प्रेम कमी झालं, इतका संकोचित विचार मराठी माणसाला शोभत नाही. मराठी माणूस हा वैश्विक आहे. याच मराठी माणसाने अटकेपार झेंडा नेला आहे. याच मराठी माणसाने संपूर्ण भारताला स्वतंत्र केलं आहे. संपूर्ण मुघलाला भारताबाहेर काढण्याच आणि दिल्लीवर भगवा लावण्याचं काम मराठी माणसाने केलं आहे. एवढा संकोचित विचार जर कोणी त्या ठिकाणी करत असेल चुकीचं आहे.
विरोधकांवर टीका करताना ते म्हणाले की, विरोधकांकडे मुद्देच राहिलेले नाहीत. त्यांच्या लोकांशी टर्चदेखील राहिलेला नाही. लोकांच्या मनात काय आहे हे त्यांना माहिती नाही. म्हणूनच ते असे मुद्दे उचलत आहे, जे मुद्दे खरं म्हणजे ज्यातून लोकांवरही त्याचा परिणाम होत नाही.