Santosh Deshmukh Murder Case : बीडमधील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील हादरवणारे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आणि सर्वच स्तरांतून या फोटोंनंतर हळहळ व्यक्त करण्यात आली. अतिशय अमानुष पद्धतीनं देशमुख यांना माराहाण करत असूरी वृत्तीनं आरोपींनी हा गुन्हा केला आणि त्याची छायाचित्र, व्हिडीओसुद्धा काढले. या कृत्याचा निषेध समाजाच्या सर्व स्तरांतून केला जात असून, आता ही मन हेलावणारी दृश्य व्हायरल झाल्यानंतर बीड जिल्हा बंदची हाक देण्यात आली आहे.
संतोष देशमुख्य हत्या प्रकरणातील आरोपींना फाशीची शिक्षा दिली जावी अशी मागणी यादरम्यान करण्यात येतेय. देशमुख हत्या प्रकरणातील आरोप पत्रात सरपंच देशमुख यांची हत्या नेमकी कशी झाली याचे फोटो समोर आले ज्यानंतर नेतेमंडळींनीसुद्धा सोशल मीडियाचा आधार घेत घडल्या प्रकाराचा तीव्र शब्दांत निषेध केला.
शिवसेनेच्या ठाकरे गटाच्या नेत्या आणि प्रवक्त्या सुषमा अंधारे यांनीसुद्धा सोशल मीडियाचा आधार घेत व्हायरल झालेले हे फोटो पाहता या वृत्तीचा आणि गुन्हेगारांची शिक्षा लांबवणाऱ्यांवर शाब्दिक तोफ डागली. 'माणसांना संपवण्यासाठी ... दहशत वाढवण्यासाठी सत्ता हवी असेल तर आग लागो अशा सत्तेला... ' अशा शब्दांत अंधारे यांनी घडल्या प्रकरणी प्रतिक्रिया दिली.
''मी राक्षस बघितला नाही. दंतकथेत त्याची वर्णन ऐकली वाचली आहेत. पण आजचे फोटो बघितल्यानंतर त्या राक्षसांचे चेहरे कसे दिसत असतील त्याची कल्पना येतेय. प्रचंड अस्वस्थ आहे. कितीही प्रयत्न केला तरी श्वास आणि मन अजूनही संतुलित करता येत नाही. माझी ही अवस्था असेल तर ज्या माऊलीने लेकरू गमावले त्या मायमाऊलीचं काय..?
इतकं क्रौर्य उरात घेऊन माणसा जगतात तरी कशी..? आपल्याकडे सत्ता असली पाहिजे सत्ता असल्यानंतर आपल्याला गोरगरिबांचे प्रश्न मांडता येतील त्यांच्या न्याय हक्कासाठी आवाज उठवता येईल असं वाटत होतं. पण संतोष अण्णाच्या बाबतीचे घडले ते बघितल्यानंतर माझ्याकडे सत्ता नाही याचा मला आनंद आणि समाधान वाटतय. तुम्ही कुठला तो पिक्चर म्हणताय तो मी नाही बघितलेला. पण कदाचित त्याच्यात सुद्धा औरंगजेबाच्या क्रौर्याची ही परिसीमा दाखवली नसेल.
इतका हिंसक आणि क्रूर विचार घेऊन ही माणसं जगत कशी असतील. यांच्या रक्तामासाच्या कुटुंबीयांना बोलताना भेटताना पोटच्या लेकराच्या डोक्यावरून पाठीवरून हात फिरवताना त्या पोटच्या लेकराला अशा गिधाड्यांच्या हातात माया जाणवत असेल का. की त्यांचंही अंग शहारून थरारून जात असेल.
आपला बाप भाऊ मुलगा इतका क्रूर आहे की त्याने प्रेमाने जरी पाठीवरून हात फिरवला तरी त्याची नखं आत रुतून जातील आणि आपण रक्तबंबाळ होऊन जाऊ हा विचार त्यांच्या लेकरांच्याही मनात येत असेल का... ?
एवढं होऊनही बीड शांत आहे. परळी शांत आहे. परळीतली नेतेमंडळी शांत आहेत. त्यांच्या शांत असण्याची कारण काहीही असू देत. पण मी शांत आहे. मी का शांत आहे. मी दहशतीखाली आहे का. मला सतत भीती वाटतेय का..? माणसांना संपवण्यासाठी. दहशत वाढवण्यासाठी सत्ता हवी असेल तर आग लागो अशा सत्तेला.
जळो तुमचं राजकारण. जळो तुमचे डावपेच. हा माझा प्रांत नाही. मला इतकं क्रूर व्हायचं नाही. मी माणूस आहे... अन् माझं माणूसपण या क्रूर राजकारणापेक्षा लाख मोलाचं आहे... !!!''