CM Devendra Fadanvis: आम्ही तिघे वेगळे असलो तरी जे काम करतो त्यातून सुर निघत असल्याचं देवेंद्र फडणवीस म्हणालेत.आमच्या पक्षात वेगवेगळे लोकं आहेत. आमचा बँडच तसा आहे. आमच्या बँडमधील लोकं वेगवेगळ्या वेळी वेगवेगळ्या स्टाईलनं गाणं म्हणतात. फडणवीसांच्या या विधानानं एकच हशा पिकल्याचं पाहायला मिळालं. झी 24 तासच्या महाराष्ट्र गौरव पुरस्कार सोहळ्यात मुख्यमंत्री बोलत होते.
देवेंद्र फडणवीस- एकनाथ शिंदे आणि अजितदादा असं त्रिशूळ सरकार महाराष्ट्रात सत्तेत आहे. तीन पक्षांचं हे सरकार एकदिलानं काम करत असल्याची ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिलीये. झी 24 तासच्या महाराष्ट्र गौरव सोहळ्यात मुख्यमंत्र्यांनी महायुती सरकारच्या कार्यशैलीवर सविस्तर भाष्य केलं. संगीतकारांच्या टीमप्रमाणं महायुतीतही एक टीम आहे. तिघांचे सूर वेगळे असले तरी ते सुरेल असल्याचं फडणवीसांनी सांगितलं.
महायुती सरकारमध्ये काहीजण वेगळे राग छेडतात असा प्रश्न विचारल्यावर मुख्यमंत्र्यांनी विनोदी शैलीत या प्रश्नावर उत्तर दिलं. मेट्रोच्या ट्रायल रनवेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे एकत्र आले होते. यावेळी महायुतीतल्या तीन नेत्यांच्या सुरांबाबत एकनाथ शिंदेंना प्रश्न विचारण्यात आला. त्यावर एकनाथ शिंदेंनी महायुती सरकार बुलेट ट्रेनच्या गतीनं धावत असल्याचं सांगितलं.
महायुती सरकारचा बँण्ड असो की महायुतीची बुलेट ट्रेन. बँण्डचा कॅप्टन असलेले फडणवीस हे कुल स्वभावाचे आहेत. जर कुणी बेसुरा आढळलाच तर त्याला सुरात आणताना फडणवीस दिसतायत.
शंकर, एहसान, लॉय यांच्याप्रमाणे आमचंही त्रिकूट आहे. आमच्याकडेही कोणीतरी शास्त्रीय संगीत आळवत, गिटार वाजवत. कोणीतरी वेगळा सूर आळवत पण आमची स्टाइल तशीच आहे. यात ड्रमर कोण आहे, हे कधीच कोणाला कळणार नाही, असे मिश्किलपणे मुख्यमंत्री म्हणाले.
आम्ही १०० दिवसांचा कार्यक्रम दिला होता. ज्यात स्वच्छता, नामफलक लावायचं होतं प्रलंबित कामे पूर्ण करायची होती. सर्व कार्यालयांनी अतिशय योग्य रितीने हे काम पार पाडलं. एकूण ९०० सुधारणा करायच्या होत्या. त्यातील ७६८ म्हणजे ८० टक्के कामे आम्ही केली. यासाठी एक संस्था नेमून त्याचे मुल्यमापन केले. एखादा अपवाद वगळता सर्वजण त्यात पास झाले. याचा पुरस्कार म्हणून मी आता १५० जणांचा कार्यक्रम मी त्यांना दिला असल्याचे मुख्यमंत्री यावेळी म्हणाले. सरकार म्हणून जे उपकरण आहे ते संस्था म्हणून तयार व्हायला हवी. सरकारच्या कामासाठी नागरिकाला कार्यालयात जायची गरज लागू नये. सर्व कामे मोबाईलवर होतील. यातील ६० टक्के काम आम्ही केलंय. आता ४०टक्के काम राहिलं असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. तिन्ही पक्षाच्या खात्यांनी चांगले काम केलंय. तीन लोकाचं सरकार नॅचरल डिलीव्हर होऊ शकत नाही. जिथे एकमत होत नाही ते आम्ही स्थगित ठेवतो. तोडगा कसा काढायचा हे सांगता आलं असतं तर तोडगा काढूनच आलो असतो. तोडगा निघेल असं महिनाभरापूर्वी सांगितलं होतं पण महिना कोणता असेल हे सांगितलं नव्हतं, अशी मिश्किल टिप्पणी मुख्यमंत्री फडणवीसांनी केले.
एकनाथ शिंदे शिवसैनिक आहेत. शिवसैनिक हे भावनिक असतात. त्यांच्याकडे संवेदनशिलता अधिक असते. अजितदादा राजकारणात अतिशय प्रॅक्टीकल आहेत. भावनेत न अडकता निर्णय घ्यायचा असं त्यांना वाटतं. दोघांसोबतही डील करणं सोपं जातं. म्हणूनच आम्ही शंकर एहसान लॉय आहोत, असे फडणवीस म्हणाले.
आम्ही मुंबई महायुती म्हणूनच लढणार. शंभर टक्के महायुती येईल आणि महायुतीचाच महापौर बसेल, असे मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले. युतीत यायचे नाही, उद्धव ठाकरेंनी ठरवलंच होतं. त्यामुळे युतीत सडलो वैगेरे ते म्हणत होते. कधीकधी कौतुकावरही सावरुन प्रतिक्रिया द्यावी लागते. उद्धव ठाकरे कधी कौतुक करतात कधी शिव्या देतात. एकत्र येण्याची अशी कोणतीही परिस्थीती आता दिसत नाही, असे मुख्यमंत्री म्हणाले.