राष्ट्रवादीचे आमदार जयंत पाटलांच्या एका विधानाची चांगलीच चर्चा सुरू झालीय. थोडे दिवस थांबा आणि पाहा असं सूचक वक्तव्य जयंत पाटील यांनी केलं आहे. तर जयंत पाटलांच्या या वक्तव्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी देखील पाटलांच्या प्रवेशाबाबत एक मोठं विधान केलं. काय म्हणाले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस.. पाहुयात याच संदर्भातला आमचा हा स्पेशल रिपोर्ट
पवारांच्या राष्ट्रवादीचे माजी प्रदेशाध्यक्ष आणि आमदार जयंत पाटलांनी एक सूचक वक्तव्य केलं आहे. जयंत पाटलांनी केलेल्या विधानानंतर पुन्हा एकदा राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे. काही दिवसांपूर्वी जयंत पाटलांनी प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा दिला. त्याच्या जागी शशिकांत शिंदेंची प्रदेशाध्यक्षपदी निवड करण्यात आली होती. राष्ट्रवादीत झालेल्या फेरबदलानंतर जयंत पाटील पवारांची साथ सोडत भाजपात जातील अशी चर्चा होती. मात्र ही चर्चा सुरू असतानाच जयंत पाटलांनी एक सूचक विधान करत इशारा दिला आहे.
थोडे दिवस थांबा आणि बघा, जयंत पाटलांचा कुणाला इशारा?
जयंत पाटलांच्या विधानावर उद्योगमंत्री उदय सामंतांनी देखील प्रतिक्रिया दिलीय. जयंत पाटलांनी सूचक इशारा दिला असेल तर वाट बघुयात ते कोणता निर्णय घेतात? असं विधान उदय सामंतांनी केलं आहे. त्यांनी सूचक इशारा दिला असल्यास आपण थोडे दिवस थांबू असं
उदय सामंत यांनी सांगितलं आहे.
जयंत पाटलांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी पूर्णविराम दिला आहे. तुम्हाला अपेक्षीत असलेला प्रवेश आमच्या मनात सध्यातरी नाही असं म्हणत मुख्यमंत्र्यांनी जयंत पाटलांसंदर्भात स्पष्टच सांगितलं आहे.
पावसाळी अधिवेशनात जयंत पाटलांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या योजनांचं कौतुक केलं होतं. तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी जयंत पाटलांच्या विधानानंतर त्यांची फिरकी घेतली होती. दरम्यान यावेळी देखील राजकीय वर्तुळात वेगवेगळ्या चर्चांना तोंड फुटलं होतं.
याआधीही जयंत पाटलांनी अनेकदा सूचक विधानं केली आहेत. दरम्यान आताही जयंत पाटलांनी आगामी काळात राजकीय उलथापालथ होण्याचे संकेत दिले आहेत. त्यामुळे जयंत पाटलांच्या मनात नेमकं काय सुरूय. अशी चर्चा पुन्हा एकदा सुरू झाली आहे.