Pune Swargate Rape Case Dattatraya Gade Arrest: पुण्यातील स्वारगेट बस स्थानकात तरुणीवर झालेल्या बलात्कार प्रकरणानं सारा महाराष्ट्र हादरलेला असताना या प्रकरणातील मोठी बातमी शुक्रवारी समोर आली. बलात्कार प्रकरणातील नराधमाला अखेर अटक करण्यात आली. स्वारगेट बस स्थानकात तरुणीवर अत्याचार करणारा दत्तात्रय गाडे याला अटक करण्यात गुरुवारी रात्री उशिरा पुण्यातील शिरूर तालुक्यातील गुनाट गावातून अटक करण्यात आली.
इथं आरोपी पोलिसांच्या अटकेत असतानच तिथं राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सदर प्रकरणी या अटकेनंतर पहिली प्रतिक्रिया दिली. 'आरोपी लपून बसला असता पोलिसांनी विविध तंत्रज्ञानांचा वापर करत अखेर शोधून काढत अटक केली. या घटनेचा लवकरच पर्दाफाश होईल. काही माहिती पोलिस आयुक्तांनी दिली आहे. पण, आणखी माहिती या क्षणी देणं योग्य नाही. त्यामुळं योग्य वेळी ती माहिती आपणापर्यंत पोहोचेल', असं ते माध्यमांशी संवाद साधताना म्हणाले.
योग्य घटनाक्रम काय आहे, तो कसा घडला यासंदर्भातील सर्व माहिती आपणाला मिळेल असं आश्वासक वक्तव्य त्यांनी केलं. सदर प्रकरणात इतर कोणतीही माहिती देणं घाईचं ठरणार असून, माहितीची पुष्टी झाल्यावर त्यावर बोललं पाहिजे असं ते म्हणाले. आमच्याकडे सविस्तर माहिती आली आहे, काही तांत्रिक बाबीसुद्धा समोर आल्या आहेत. ही सर्व माहिती एकवटून त्यानंतर वक्तव्य करणं योग्य ठरेल असं त्यांनी स्पष्ट केलं.
दरम्यान, राज्याचे गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी सदर घटनेवर 'तरुणीनं प्रतिकार केला नाही म्हणून घटना घडली', अशा आशयाचं वक्तव्य केल्यासंदर्भात विचारलं असता त्यांच्या वक्तव्याला वेगळ्या पद्धतीनं घेण्यात आलं असं मुख्यमंत्री म्हणाले. 'आपल्या आकलनानुसार तो भाग वर्दळीचा आहे, आजूबाजूला माणसं होती, बस गर्दीच्या ठिकाणी होती. पण लोकांना प्रतिकार होताना लक्षात आलं नाही असं सांगण्याचा त्यांचा प्रयत्न होता. ते नवे आहेत, नवे मंत्री आहेत. त्यामुळं मी त्यांना सल्ला देईन की अशा प्रकरणांमध्ये बोलताना आपण संवेदनशीलपणे बोललं पाहिजे. अन्यथा अशा वक्तव्यांचा समाजमनावर परिणाम होतो', असं म्हणत त्यांनी कदम यांना सल्ला दिला.
प्रत्यक्षदर्शींनुसार गावातील शेतात आरोपी लपून बसला होता. मध्यरात्रीनंतर पुणे पोलिसांनी ग्रामस्थांच्या मदतीनं शेतातून त्याला अटक केली. तब्बल 75 तासांनी आरोपीला अटक करण्यात पोलीस यंत्रणांना यश. आरोपी एका शेतातील कॅनलच्या बाजूला झोपला असतानाच पकडण्यात आलं. ज्यानंतर पुणे पोलिसांनी या नराधमाला लष्कर पोलीस स्टेशनच्या लॉकअप मध्ये ठेवण्यात आलं.