Marathi News> महाराष्ट्र बातम्या
Advertisement

'कोण बाप? कोणाचा बाप?' राऊतांचा फडणवीसांना सवाल; म्हणाले, 'आई-बाप पुढच्या...'

CM Devendra Fadnavis Vs Sanjay Raut: पंतप्रधान नरेंद्र मोदींनी गुढीपाडव्याच्या दिवशी नागपुरमधील संघाच्या मुख्यालयाला भेट दिल्याच्या मुद्द्यावरुन करण्यात येत असलेल्या टीकेवरुन दोन्ही नेत्यांमध्ये जुंपली.

'कोण बाप? कोणाचा बाप?' राऊतांचा फडणवीसांना सवाल; म्हणाले, 'आई-बाप पुढच्या...'

CM Devendra Fadnavis Vs Sanjay Raut: उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे प्रवक्ते तसेच खासदार संजय राऊत (Sanjay Raut) आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांमध्ये (Devendra Fadnavis) पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या निवृत्तीवरुन जुंपल्याचं चित्र सध्या पाहायला मिळत आहे. संजय राऊतांनी सोमवारी केलेल्या केल्या विधानावरुन फडणवीसांनी प्रत्युत्तर दिल्यानंतर आज राऊतांनी पुन्हा एकदा यावर भाष्य करत फडणवीसांना, 'कोण बाप?' असा प्रश्न मोदींचा उल्लेख करत विचारला आहे.

राऊत आधी काय म्हणालेले?

"मोदींचा वारसदार संघ ठरवेल असं दिसत आहे. संघाची चर्चा बंद दाराआड असते. बंद दाराआड झालेली चर्चा बाहेर येत नाही. पण काही संकेत स्पष्ट असतात. संघ पुढील नेता ठरवेल आणि तो बहुतेक महाराष्ट्रातील असेल," असा दावा संजय राऊत यांनी सोमवारी केला. यावर फडणवीस यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना राऊतांना टोला लगावला. "भारतीय संस्कृतीत वडील जिवंत असताना मुलांचा विचार होत नाही आणि करायचाही नसतो," असं विधान फडणवीसांनी केलं.

फडणवीसांनी लगावला टोला

संजय राऊतांनी नरेंद्र मोदींचा उत्तराधिकारी म्हणून तुमचं नाव घेतल्यासंबंधी विचारलं असता देवेंद्र फडणवीस म्हणाले की, "नरेंद्र मोदींचा उत्तराधिकारी शोधण्याचं कोणतंही कारण नाही. नरेंद्र मोदी आमचे नेते आहेत. अजून बरीच वर्षं नरेंद्र मोदी काम करणार आहेत. आमचा सर्वांचा आग्रह आहे. आम्ही 2029 चे पंतप्रधान म्हणून मोदींकडेच पाहत आहोत. त्यामुळे आता अशी चर्चा करणं योग्य नाही". पुढे ते म्हणाले की, "भारतीय संस्कृतीत वडील जिवंत असताना मुलांचा विचार होत नाही आणि करायचाही नसतो. ही मुघली संस्कृती आहे. तिथे वडील जिवंत असताना मुलं अशा प्रकारचे विचार करतात. सध्या कोणताही उत्तराधिकारी निवडण्याचा प्रश्न नाही," असं म्हणत पंतप्रधान मोदींना वडिलांची उपमा फडणवीसांना दिली होती. 

राऊतांचं प्रत्युत्तर

मोदींच्या उत्ताराधिकाऱ्यावरुन प्रश्न विचारला असता संजय राऊतांनी, "हे देवेंद्र फडणवीस ठरवणार नाहीत. हे देवेंद्र फडणवीस यांच्या हातात नाही. 2019 ला फडणवीस यांच्या पक्षाचा महाराष्ट्रात पराभव झाला. 2024 ला मोदी लोकसभेत बहुमताचा आकडा गाठू शकले नाहीत. स्वतः नरेंद्र मोदी यांनी पक्षाला 75 वर्षाचा नियम केलाय. हा नियम लालकृषण अडवाणी, मुरली मनोहर जोशी यांना लागू होता. सप्टेंबर महिन्यात मोदी 75 वर्षाचे होत आहेत म्हणून त्यांना नियमाने निवृत्त व्हावं लागणार आहे," असा उल्लेख केला. 

अडवाणी यांचा पंतप्रधान पदाचा हक्क असताना...

पुढे बोलताना, "फडणवीसांनी केलेला बाप-लेकाचा संदर्भ देत संजय राऊतांनी, "फडणवीस काय म्हणाले होते, बाप जिवंत असताना मुलांचा विचार होत नाही. कोण बाप? कोणाचा बाप? देशाला बाप नाहीये. मोदी हे पंतप्रधान आहेत. ही एक तात्पुरती व्यवस्था असते," असं राऊत म्हणाले. "राम आणि कृष्णदेखील कार्य संपल्यावर निघून गेले. अडवाणी जिवंत असताना त्यांना शाहजानप्रमाणे कोंडून ठेवलं आणि मोदी पंतप्रधान झाले. आजचा भाजप दोन जगांपासून सत्तेच्या शिखरावर नेण्याचं काम अडवाणी यांच्यासारख्या नेत्याने केलं. अडवाणी यांचा पंतप्रधान पदाचा हक्क असताना मोगली संस्कृतीप्रमाणे कोंडून ठेवलं," असा घणाघात राऊतांनी केला.

...तर फडणवीस नकली स्वयंसेवक

"अजित पवार, एकनाथ शिंदे यांना ट्रोल का करतात यावर मी बोलणार नाही. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ही भाजपाची मातृसंस्था आहे. आई-बाप पुढच्या गोष्टी ठरवतील. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं राजकारणात काय महत्व आहे हे फडणवीस यांना सांगायची गरज असेल तर ते नकली स्वयंसेवक आहेत. अध्यक्ष पदाची मुदत संपली असून हे अजून अध्यक्ष नेमू शकले नाहीत. यात संघाची महत्वाची भूमिका आहे. पडद्यामागे काहीतरी शिजत आहे," असं सूचक विधान राऊतांनी केलं.

Read More