Devendra Fadnavis On Taking Resignation of Dhananjay Munde: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी अखेर मंत्री धनंजय मुंडेंचा राजीनामा मागितल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. सोमवारी रात्री पोलिसांनी संतोष देशमुखांच्या हत्याप्रकरणात दाखल केलेल्या आरोपपत्रामधील फोटो आणि तपशील समोर आल्यानंतर महाराष्ट्रामध्ये संतापाची लाट पसरलेली असतानाच मध्यरात्री एक गुप्त बैठक झालं. या बैठकीमध्ये देवेंद्र फडणवीसांनी थेट धनंजय मुंडेंना राजीनामा देण्याचा आदेश दिला आहे. मात्र धनंजय मुंडेंच्या या राजीनाम्यासाठी फडणवीस आधीपासूनच आग्रही होते. तरीही मुंडेंनी या प्रकरणात राजीनामा देण्यास टाळाटाळ केली. धनंजय मुंडेंच्या पक्षाचे अध्यक्ष अजित पवारांनीही या प्रकरणामध्ये धनंजय मुंडेंकडे थेट राजीनाम्याची मागणी करण्याऐवजी मुख्यमंत्र्यांच्या कोर्टात राजीनाम्याचा चेंडू ढकलला होता. मात्र मुख्यमंत्र्यांकडूनही राजीनामा मागण्याचा अधिकार पक्ष अध्यक्ष म्हणून अजित पवारांचा असल्याचं म्हटलं होतं.
पहिल्या दिवसापासून धनंजय मुंडेंचा राजीनामा कोणी मागायचा आणि द्यायचा कोणी यावरुन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवारांकडून टाळाटाळ केली जात होती. मात्र मुख्यमंत्री फडणवीस पहिल्या दिवसापासून या राजीनाम्यासाठी आग्रही होते. मात्र धनंजय मुंडेंनी या प्रकरणामध्ये मी निर्दोष आहे. या प्रकरणाशी माझा काहीही संबंध नाही असं सांगत राजीनामा द्यायला तयार नव्हते. अजित पवारांनी धनंजय मुंडेचा राजीनामा घ्यावा असं मुख्यमंत्र्यांनी अनेकदा प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितलेलं. अजित पवार हे पक्षाचे अध्यक्ष असून मुंडे त्यांच्या पक्षाचे आमदार आणि मंत्री आहेत असं फडणवीसांनी म्हटलं होतं. मात्र या प्रकरणासंदर्भातील फोटो समोर आल्यानंतर सरकारवर प्रश्न उपस्थित होऊ लागल्यानंतर देवेंद्र फडणवीसांनी रात्री उशीरा अजित पवारांच्या बंगल्यावर झालेल्या बैठकीमध्ये थेट अजित पवारांसमोरच धनंजय मुंडेंना राजीनामा द्या आणि या पदावरुन मुक्त व्हा, असं स्पष्टपणे सांगितलं आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.
राजीनामा कोणी घ्यावा, मागावा कोणी यामधून ही चर्चा पुढे गेली असून फडणवीसांनी मुंडेंना थेट पदावरुन बाजूला व्हा आणि राजीनामा घ्या असं सांगितलं आहे. त्यामुळे आज धनंजय मुंडे राजीनामा देतील असं सांगितलं जात आहे. राजीनामा कोणी मागायचा आणि कोणी घ्यायचा यावरील चर्चा बाजूला ठेवत फडणवीसांनी धनंजय मुंडेंचा विरोध झुगारुन लावत राजीनाम्याची मागणी या बैठकीत केली.
मध्यरात्री साडेबाराच्या सुमारास अजित पवारांच्या देवगिरी बंगल्यावर झालेल्या बैठकीसाठी स्वत: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पोहोचले होते. यावेळी तिथे अजित पवारांबरोबर धनंजय मुंडे आणि सुनिल तटकेरीही उपस्थित होते. याच बैठकीत देवेंद्र फडणवीस यांनी धनंजय मुंडे यांना राजीनामा देण्यास सांगितले. हा राजीनामा आजच द्यावा, असे फडणवीसांनी धनंजय मुंडेंना सांगितले आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.