Marathi News> महाराष्ट्र बातम्या
Advertisement

आरोग्य विभागात 1446 वैद्यकीय अधिकाऱ्यांची पदस्थापना; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी केलं कौतूक, म्हणतात...

Maharastra health department : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे  (CM Eknath Shinde) यांच्या हस्ते १४४६ एमबीबीएस डॉक्टरांना पदस्थापनेचे आदेश ऑनलाईन देण्यात आले.

आरोग्य विभागात 1446 वैद्यकीय अधिकाऱ्यांची पदस्थापना; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी केलं कौतूक, म्हणतात...

Mumbai News : आरोग्य विभागाच्या महाराष्ट्र वैद्यकीय व आरोग्य सेवा वैद्यकीय अधिकारी गट-अ पदाची भरती प्रकिया पूर्ण करण्यात आली. आज विधानभवनात मंत्रिमंडळ बैठकीपूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते १४४६ एमबीबीएस डॉक्टरांना पदस्थापनेचे आदेश ऑनलाईन देण्यात आले. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, आरोग्य मंत्री प्रा. डॉ. तानाजी सावंत तसेच मंत्रिमंडळातील सदस्य उपस्थित होते. 

आरोग्य विभागाने युद्ध पातळीवर ही भरती प्रक्रिया यशस्वीपणे राबविली. मोठ्या प्रमाणावर वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या रिक्त पदांची भरती झाली असून त्यामाध्यमातून राज्यातील सामान्य नागरिकांना वेळेवर आणि गुणवत्तापूर्ण आरोग्य सेवा देण्यात यावी, असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी यावेळी केले.

महाराष्ट्र वैद्यकीय व आरोग्य सेवा वैद्यकीय अधिकारी गट-अ या संवर्गातील १७२९ रिक्त पदांसाठी एमबीबीएस व बीएएमएस उमेदवारांचे एकूण २९ हजार ५५६ अर्ज ऑनलाईन पोर्टल द्वारे प्राप्त झाले होते. ६५७५ एमबीबीएस अर्हताधारक उमेदवारांनी अर्ज केले होते. एमबीबीएस अर्हताधारक उमेदवारांनी सादर केलेल्या अर्जाची छाननी करुन अंतिम गुणवत्ता यादीनुसार १४४६ एमबीबीएस अर्हताधारक उमेदवारांची निवड यादी प्रसिद्ध करण्यात आली. त्यांना आज पदस्थापनेचे आदेश देण्यात आले. 

वैद्यकीय अधिकारी गट-अ या संवर्गातील १७२९ रिक्त पदे नामनिर्देशनाने भरण्याबाबत शासनाने ३० जानेवारी २०२४ रोजी मान्यता दिली होती. याबाबत दि. ३१ जानेवारी २०२४ रोजी प्रसिद्ध जाहिरात करण्यात आली होती. पदभरती प्रक्रियेत पारदर्शकतेसाठी ऑनलाईन पोर्टलद्वारे पात्र उमेदवारांचे अर्ज मागविण्यात आले होते. ऑनलाईन अर्ज भरण्याची मुदत दि. १ ते १८ फेब्रुवारी २०२४ पर्यंत देण्यात आली होती. त्यानंतर छाननी प्रक्रीया पूर्ण करून आज आदेशही देण्यात आले. अत्यंत कमी दिवसात ही प्रक्रिया पूर्ण करून वैद्यकीय अधिकाऱ्यांना तात्काळ नियुक्तीसाठी युद्ध पातळीवर प्रयत्न करण्यात आले.

विधानभवनात झालेल्या या कार्यक्रमाला आरोग्य विभागाचे अपर मुख्य सचिव मिलिंद म्हैसकर, आरोग्य सेवा आयुक्त धीरज कुमार, संचालक डॉ. नितीन अंबाडेकर तसेच आरोग्य विभागातील अधिकारी उपस्थित होते.

Read More