Marathi News> महाराष्ट्र बातम्या
Advertisement

उस्मानाबाद उपकेंद्राचे विद्यापीठात रूपांतर करण्यासाठी समिती गठीत: उदय सामंत

बैठकीला खासदार ओमराजे निंबाळकर आणि आमदार कैलास घाडगे पाटील उपस्थित होते.

उस्मानाबाद उपकेंद्राचे विद्यापीठात रूपांतर करण्यासाठी समिती गठीत: उदय सामंत

मुंबई : विद्यार्थ्यांच्या हितासाठी उस्मानाबाद येथील उपकेंद्राचे विद्यापीठात रूपांतर करता येईल का यासाठी एक अभ्यासगट म्हणून सात सदस्यांची समिती गठीत करण्यात येणार असल्याचं उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी म्हटले आहे. आज मंत्रालयात झालेल्या बैठकीत खासदार ओमराजे निंबाळकर आणि आमदार कैलास घाडगे पाटील उपस्थित होते.

उदय सामंत यांनी म्हटलं की, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ औरंगाबाद ते उस्मानाबाद जिल्ह्याचे अंतर अधिक आहे. याचा भौगोलिक दृष्टीने विचार करून विद्यार्थ्यांना त्रास होऊ नये यासाठी उस्मानाबाद उपकेंद्राचे विद्यापीठात रूपांतर करावे अशी अनेक वर्षांपासूनची  मागणी आहे. गठीत केलेल्या समितीने विद्यार्थ्यांना शैक्षणिक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी त्यांच्या अडचणी काय आहेत या सर्व शैक्षणिक दृष्टीने अभ्यास करून तीन महिन्यांत आपला अहवाल शासनांकडे सादर करावा. अशा सूचनाही उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी दिल्या आहेत.

मंत्रालयात झालेल्या या बैठकीत उस्मानाबादचे जिल्हाधिकारी दिपा मुधोळ-मुंडे, उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे संचालक डॉ.धनराज माने, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. प्रमोद येवले आणि संबंधित अधिकारी उपस्थित होते.

Read More