राज्यातील आजी माजी मंत्री आणि अधिकारी हनीट्रॅपमध्ये अडकल्याचा दावा करण्यात येत आहे. हनीट्रॅपच्या माध्यमातून गोपनीय कागदपत्रं बाहेर येत आहेत. यात अनेक IAS अधिकारी आणि काही मंत्री सहभागी आहेत. त्यामुळे सरकारनं यावर स्पष्टीकरण द्यावं अशी मागणी काँग्रेस आमदार नाना पटोले यांनी विधानसभेत केली आहे. हनी ट्रॅपच्या माध्यमातून गोपनीय शासकीय कागदपत्रं राज्याबाहेर जात असल्याचा आरोप नाना पटोलेंनी केला आहे.
सरकारी अधिकारी, मंत्री हनीट्रॅपच्या जाळ्यात
गोपनीय कागदपत्रं मिळवण्याचा हनीट्रॅपमधून धंदा
विरोधकांच्या आरोपानं शासकीय यंत्रणेत खळबळ
काँग्रेस नेते नाना पटोलेंनी विधानसभेत एक आरोपांचा बॉम्बगोळाच टाकला आहे. शासकीय यंत्रणेतले अनेक उच्चाधिकारी हनीट्रॅपमध्ये अडकल्याचा आरोप नाना पटोलेंनी केला आहे. काही मंत्रीही हनीट्रॅपचे शिकार झाल्याचा आरोप करण्यात आला आहे. या हनीट्रॅपच्या माध्यमातून सरकारची गोपनीय माहिती चोरली जातेय का याची भीतीही त्यांनी व्यक्त केली आहे.
हनीट्रॅप प्रकरण नाशिकपासून अकोल्यापर्यंत सरकारच्या वेगवेगळ्या विभागात सुरु असल्याची दबक्या आवाजात चर्चा आहे. त्याला अधिकृत दुजोरा मात्र कोणीही देत नाही. नाना पटोलेंनी विधानसभा अध्यक्षांना या प्रकरणाची चौकशी करण्याचे निर्देश देण्याची मागणी केली. विधानसभा अध्यक्षांनीही सरकारला नाना पटोलेंनी जो दावा केलाय त्या दाव्यातील तथ्य तपासण्याचे आदेश दिले.
सरकारमधील मंत्री हनीट्रॅपमध्ये अडकल्याचा गंभीर आरोप विरोधकांनी केल्यानंतरही सरकार मात्र निवांत दिसत आहे. महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळेंनी या आरोपांबाबत गृहविभाग आणि पोलीस चौकशी करतील असं सांगून वेळ मारुन नेली.
सरकारी अधिकारी आणि मंत्र्यांना हनीट्रॅपमध्ये अडकवून लुटण्याचा खेळ सुरु आहे का?... हनीट्रॅपमध्ये अडकलेल्या सरकारी बाबूंकडून कसल्या प्रकारची माहिती काढली जाते. सरकारी कंत्राटं मिळवण्यासाठी किंवा पैसे उकळण्यासाठी एक गुन्हेगारी टोळीच सक्रिय आहे का असा संशय घेतला गेलाय. विरोधकांनी संशय घेतलाय त्यामुळं सरकारी पातळीवर त्याची चौकशी होणं गरजेचं झालं आहे.