Dombivli RSS Sakha Attack: डोंबिवलीमधील खंबाळपाडा परिसरातील चौधरीवाडी मैदानात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या वीर सावरकर शाखेवर 10 मार्च रोजी करण्यात आलेल्या दगडफेक प्रकरणामध्ये आता पोलिसांवरच कारवाई करण्यात आली आहे. मागील दोन दिवसांपासून चर्चेत असलेल्या या प्रकरणामध्ये एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याला नोकरी गमवावी लागली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, 10 मार्च रोजी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास या शाखेमध्ये लहान मुले प्रशिक्षण घेत असताना अचानक शेजारील जंगल आणि इमारतीतून दगडफेक करण्यात आली होती. मात्र सुदैवाने यात कोणतीही जखमी झालं नाही. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडून वीर सावरकर शाखा नावाने काही महिन्यांपूर्वीच ही शाखा सुरु करण्यात आली आहे. शाखा अध्यक्ष संजू चौधरी व शिक्षक पवन कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली शाखेचा कारभार चालतो. शाखेवरील दगडफेकीनंतर संघटनेचे कार्यकर्ते आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं. संघ कार्यकर्त्यांकडून टिळकनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणी पोलिसांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शाखेच्या बाजूला असणाऱ्या इमारतीमधील सीसीटीव्हीची पाहणी केली असता यामध्ये पाच आरोपी दगडफेक करताना कैद झाल्याचं समोर आलं. फुटेजच्या आधारे दगडफेक करणारे पाच आरोपींना ताब्यात घेतले आहे त्यात चार आरोपी अल्पवयीन असल्याने त्यांना बालसुधागृहात पाठवण्यात आले आहेत. या प्रकरणात ताब्यात घेण्यात आलेल्यांपैकी 24 वर्षीय रिजवान सय्यदला कल्याण न्यायालयाने सुनावणीमध्ये दोन दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. नेमका हल्ला का केला? संघटनेवर लहान मुलांवरती हा हल्ला का केला गेला? याच्या पाठीमागे कोणी आहे का ? या सर्व चौकशीसाठी कल्याण न्यायालयाने दोन दिवसाची पोलीस कोठडी दिली आहे.
दरम्यान, या प्रकरणी टिळक नगर पोलीस ठाण्यातील सहाय्यक पोलीस निरीक्षक जगन्नाथ शिंदे यांना निलंबित करण्यात आलं आहे. तपासात गांभीर्य न दाखवता न्यायालयात रिमांडसाठी गेले नसल्याने निष्काळजीपणाचा ठपका ठेवत शिंदेंविरोधात निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.
डोंबिवलीतील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या बाल शाखेवर काही समाजकंटकांनी दगडफेक केल्याचा निषेधार्थ संघाच्या कार्यकर्त्यांनी फडके रोडवर निषेध नोंदवला. संघाच्या शाखेवर हल्ला करणाऱ्यांमध्ये अल्पवयीन मुलांचा समावेश होता. या घटनेच्या निषेधार्थ बुधवारी संध्याकाळी डोंबिवलीतील शेकडो नागरिकांनी फडके रोडवर एकत्र येत निषेध नोंदवला. डोंबिवलीकरांनी निषेध फलक हातात घेऊन दगडफेकीचा जाहीर निषेध केला. 'एक है तो सेफ है', 'बटेंगे तो कटेंगे' आणि 'हिंदू बांधवांनो जागे व्हा' असे फलक निषेध नोंदवणाऱ्यांच्या हाती होते. अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला होता.