Crime Against Women In Maharashtra: महाराष्ट्राला हादरवून सोडणारी पुण्यातील स्वारगेट बस स्थानकामधील बलात्काराची घटना ताजी असतानाच महाराष्ट्रातील वेगवेगळ्या भागांमधून महिला आणि मुलींवरील अत्याचाराच्या धक्कादायक बातम्या समोर येण्याचा प्रकार सुरु आहे. काळीज पिळवटून टाकणाऱ्या अशाच दोन घटना मुंबई आणि पुण्यामधून समोर आल्या आहेत. बाप आणि मुलीच्या नात्याला काळीमा फासणाऱ्या या दोन्ही घटनांनी राज्य हादरुन गेलं आहे. पुण्यात एका बापानेच आपल्या मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याची माहिती समोर आली असून मुंबईत एका इसमाने आपल्याच चार महिन्याच्या मुलीला संपवल्याची घटना समोर आली आहे.
बाप लेकीच्या नात्याला काळीमा फासनारी घटना पुण्यातील नांदेड सिटी परिसरात घडली आहे. बापानेच आपल्या मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याची माहिती समोर आली आहे. स्वतःच्या 14 वर्षीय मुलीवर नराधम बाप 8 महिने लैंगिक अत्याचार करत होता. मुलीची आई घराबाहेर गेल्यावर नराधम बाप मुलीवर जबरदस्तीने लैंगिक अत्याचार करत होता. याप्रकरणी पुण्यातील नांदेड सिटी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 'पोस्को'अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून नराधम बापाला अटक करण्यात आली आहे.
नक्की वाचा >> Pune Rape Case: 400 गावकऱ्यांनी आरोपीला शोधून काढलं; पण 'या' एकट्यालाच मिळणार 1 लाखाचं बक्षीस
बाल हक्क समितीने हा प्रकार उघडकीस आणला असून त्यानुसार गुन्हा दाखल करत नराधम बापाला काल बेड्या ठोकण्यात आल्या आहेत, असं सांगण्यात आलं आहे. या मुलीला घडलेल्या प्रकरामुळे मोठा मानसिक धक्का बसला असून प्रकरण समोर आल्यावर परिसरात खळबळ माजली आहे.
दुसरीकडे मुंबईमधील घाटकोपर येथे मुलगी नको म्हणून बापाने पाळण्यातच चार महिन्याच्या मुलीचा गळा दाबून हत्या केल्याचा प्रकार प्रकाशझोतात आला आहे. घाटकोपरमधील कामराज नगरमध्ये ही विचित्र आणि माणुसकीला काळीमा फासणारी घटना घडली आहे. संजय बाबू कोकरे असं आपल्याच चार महिन्याच्या बाळाचा जीव घेणाऱ्या नराधम बापाचं नाव असून पोलिसांनी त्याला बेड्या ठोकल्या आहेत.
नक्की वाचा >> महाराष्ट्रात महिला असुरक्षित... केंद्रीय मंत्री रक्षा खडसेंच्या मुलीसोबत टवाळखोरांची छेडछाड
मुलीच्या जन्मापासूनच संजय तिचा तिरस्कार करत होता, अशी माहिती समोर आली आहे. बाळाची आई काही कामानिमित्त घराबाहेर गेली तेव्हा संजयने पाळण्याच्या दोरीने गळा आवळून मुलीची हत्या केली. हे प्रकरण समोर आल्यानंतर कामराज नगरमध्ये एकच खळबळ उडाली आहे.