Extortion Case In Badlapur: अश्लील फोटो व्हायरल करण्याची धमकी देत 50 लाख रुपयांची खंडणी मागितल्याचा प्रकार बदलापुरमध्ये समोर आला आहे. याप्रकरणी बदलापूर पूर्व पोलिसांनी गुन्हा दाखल करत चार आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत. व्हॉट्सअपवरील एका व्हिडीओमधून खंडणीचा प्रकार सुरु झाला. पोलिसांनी माजी नगरसेवकालाच धमकावलं जात असल्याने तातडीने तपास सुरु केला.
मिळालेल्या माहितीनुसार, बदलापूरमधील माजी नगरसेवक शैलेश वडनेरे यांना महिन्याभरापूर्वी एका अज्ञात नंबरवरून व्हॉट्सअपवर एक व्हिडिओ आला, या व्हिडिओमध्ये त्यांचे अश्लील फोटो होते. हा व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत समोरच्या व्यक्तीने त्यांच्याकडे 50 लाख रुपयांची खंडणी मागितली. सुरुवातीला हा खोडसाळपणा वाटल्याने वडनेरे यांनी त्याकडे लक्ष दिलं नाही, मात्र खंडणीखोरांचा तगादा वाढल्यानंतर वडनेरे यांनी बदलापूर पूर्व पोलीस ठाण्यात याबाबत तक्रार केली. या तक्रारीची गंभीर दखल घेत बदलापूर पूर्व पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक किरण बालवडकर आणि राजेश गज्जल यांनी तांत्रिक तपास सुरु केला.
तपासाअंती बदलापूरमधूनच चार जणांना बेड्या ठोकल्या. अक्षय उर्फ बकरी गोविंद जाधव, रोनित दयानंद आडारकर, दीपक मधुकर वाघमारे आणि पुष्कर हरिदास कदम अशी अटक करण्यात आलेल्या चौघांची नावं आहेत. या सर्वांना 12 मार्च रोजी न्यायालयात हजर केल्यानंतर न्यायालयाने त्यांना 15 मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. या चौघांपैकी अक्षय उर्फ बकरी जाधव आणि दीपक वाघमारे या दोघांवर यापूर्वी अंबरनाथमध्ये एका नामांकित डॉक्टरच्या घरावर कोट्यवधी रुपयांचा दरोडा टाकल्याचा गुन्हा दाखल आहे, अशी माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक किरण बालवडकर यांनी दिली.
आधीच्या गुन्ह्यातून जामीनावर सुटल्यानंतर झटपट पैसे कमावण्याच्या उद्देशाने आरोपींनी माजी नगरसेवक शैलेश वडनेरे यांना खंडणीसाठी धमकी दिली. मात्र बदलापूर पूर्व पोलिसांनी त्यांचा हा डाव हाणून पाडत त्यांना पुन्हा एकदा बेड्या ठोकल्या आहेत. हा व्हिडीओ कसा तयार केला? अशाप्रकारे यापूर्वी कोणाकडून खंडणी मागितली आहे का? या सारख्या गोष्टींचा तपास पोलीस करत आहेत.