-प्रताप नाईक, झी 24 तास, (कोल्हापूर)
Kolhapur Love Triangle Murder: पहिलीपासून एकत्र असणाऱ्या एक मित्राने दुसऱ्या मित्राचा कड्यावरून ढकलून खून केल्याच्या घटनेनं कोल्हापूर हादरून गेलं आहे. जिल्ह्यातील केर्ले गावात ही घटना घडली आहे. या दोघाही मित्रांचा एकाच मुलीवर प्रेम जडल्याने लव्ह ट्रँगलमधून महेंद्र कुंभार या तरुणाची हत्या करण्यात आली आहे.
खरं तर पहिलीपासून एकत्र असलेल्या या दोघांच्या मैत्रीची अख्या केर्ले गावात चर्चा होती. महेंद्र कुंभार आणि अल्पवयीन मित्राची घानिष्ठ मैत्री गावभर सर्व परिचित होती. हे दोघेही मित्र बारावीची परीक्षा देखील एकत्रच उत्तीर्ण झाले. मात्र या दोघांचे एकाच मुलीवर प्रेम जडले आणि त्यानंतर एकतर्फी प्रेमातून मुलगी आपल्याला किंमत देत नसल्याच्या रागातून जिवलग मित्राला शंभर फुटावरून ढकलून त्याची हत्या केली. केर्ले गावातील महेंद्र कुंभार रात्री अकराच्या सुमारास घरातून बेपत्ता झाला. त्यानंतर त्याचा शोध सुरु झाला.
शोधाशोध केला असता गावातील मोहिते खाणीजवळ शंभर फूट खोल खाणीत महेंद्र कुंभार याचा मृतदेह आढळून आला. याप्रकरणी करवीर पोलिसांनी तपास केला असता महेंद्र कुंभार रात्री आठ वाजता घरातून बाहेर जाण्यापूर्वी त्याला जिवलग मित्राचा फोन आल्याचं समोर आलं. पोलिसांनी मित्राची कसून चौकशी केल्यानंतर आपल्या मित्राला आपणच संपवल्याचं आरोपीने पोलिसांना सांगितले. महेंद्र कुंभार हा एका मुली सोबत बोलत होता. त्या दोघांमध्ये प्रेम संबंध होते पण संशयित अल्पवयीन मुलाचेही त्याच मुलीवर एकतर्फी प्रेम होते. काही वेळा महेंद्र त्यामुली सोबतचे फोटो अल्पवयीन मित्राला पाठवायचा अन् त्यांच्या प्रेमसंबंधांबद्दल आरोपी मित्राची गप्पा मारयाचा. याचा राग मनात ठेवून अल्पवयीन मित्राने महिंद्रचा काटा काढण्याचं निश्चित करून शंभर फुटावरून ढकलून त्याची हत्या केल्याचं समोर आलं आहे.
महिंद्र आणि त्याचा अल्पवयीन संशयित मित्र पहिलीपासून एकाच वर्गात होते. दोघे एकाच बाकावर बसत होते. त्यांची मैत्री घट्ट होती.. पण दोघांचेही एकाच मुलीवर प्रेम जडल्याने एका मित्राने आपला 18 वर्षीय महेंद्र कुंभार याचा खून केला. या घटनेमुळे प्रेमाच्या त्रिकुटातून खून झाल्याची बातमी वाऱ्यासारखी पसरली. पोलिसांनी सध्या अल्पवयीन मित्राला ताब्यात घेऊन अधिक चौकशी सुरू केली आहे. पण या अल्पवयीन मित्राला महेंद्र कुंभारचा खून करण्यासाठी कोणी मदत केली का? याचा तपास पोलीस अधिक करत आहेत. महेंद्रचा खून झाल्यानंतर महेंद्रबाबत अल्पवयीन मित्राने घरात येऊन साधी चौकशी देखील केली नाही. त्यातूनच या खुनाचा उलगडा झाला, असं पोलीस निरीक्षक किशोर शिंदे यांनी सांगितलं.