Crime News Mumbai Police Sucess: मालाडमध्ये घरफोडी करुन सोने आणि हिऱ्याचे दागिने चोरणाऱ्याला चोराला पोलिसांनी 12 तासांच्या आत अटक केली आहे. मालाड परिसरात रात्रीच्या वेळेस एका इमारतीमध्ये पाईपच्या सहाय्याने चौथ्या मजल्यावर चढून एका घरातील कपाट फोडलं. या कपाटामधून चोराने सोने व हिऱ्यांचे दागिने अशी एकूण 36 लाख 40 हजार रुपये किंमतीचा ऐवज पळवला. घरफोड्या करुन चोऱ्या करणाऱ्या या सराईत आरोपीला अवघ्या 12 तासांत अटक करुन पोलिसांनी गुन्ह्यातील संपूर्ण मालमत्ता हस्तगत केली आहे.
10 एप्रिलला रात्रीच्या वेळेस मालाड पश्चिम परिसरातील एका इमारतीमधील व्यावसायिकाच्या घरात पाईपवरुन चौथ्या मजल्यावर चढून हा चोर खिडीकीतून आत शिरला. घरातील लोक झोपले असताना कपाट तोडून त्याने कपाटातील सोने व हिऱ्याचे दागीने अशी एकूण 36 लाख 40 हजार रुपये किंमतीचा ऐवज लंपास केला. यासंदर्भात मालाड पोलिस ठाण्यात तक्रार नोंदवण्यात आली. तक्रारीनुसार पोलिसांनी गुन्हा दाखल करून घेतला. मालाड पोलीस ठाणेच्या गुन्हे प्रकटीकरण पथकाने घटनास्थळचे सीसीटीव्ही फुटेज तपासून आरोपीच्या येण्याजाण्याच्या मार्गाचा पाठपुरावा केला. सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसणारा इसम हा अस्पष्ट दिसत होता. त्यामुळे रेकॉर्डवरील इतर गुन्हेगारांची नोंद तपासण्यात आली. पोलिसांनी केलेला तांत्रिक तपास आणि इतर चौकशीबरोबर ए.आय.च्या मदतीने सीसीटीव्हीमधील अस्पष्ट फुटेज स्पष्ट करुन तपासलं असता चोरट्याची ओळख पटली.
36 लाख 40 हजार रुपये किंमतीचा ऐवज पळवणारा हा चोरटा पोलीस रेकॉर्डमधील सराईत गुन्हेगार संतोष सुरेश चौधरी उर्फ वैतू असल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर एकूण चार पथकं तयार करुन आरोपीताच्या मित्रांकडे चौकशी करण्यात आली. आरोपीचा मोबाईल नंबर मिळवून पोलिसांनी तांत्रिक तपास केला. खास खबऱ्यांच्या सतत संपर्कात राहून पोलीस पथकाने अवघ्या 12 तासामध्ये मेहनतीने व कौशल्याचा वापर करत आरोपीला अटक केली.
आरोपीला अटक करण्यासाठी पोलिसांनी कामाठीपूरा, जोगेश्वरी, अंबोली, अंधेरी, बांद्रा इत्यादी ठिकाणी जवळपास 100 सीसीटीव्ही कॅमेरांची पाहणी करत त्याचा शोध घेतला. शोध घेत असताना आरोपी हा जोगेश्वरी पटरीजवळ, एका कच्च्या झोपडयापाशी दिसून आला. पोलीस पथकाने आरोपीचा जवळपास एक ते दीड किलोमीटर रेल्वे मार्गाच्या बाजूने फिल्मी स्टाइल धावत पाठलाग करुन त्यास शिताफीने ताब्यात घेत अटक केली.
अटक आरोपी संतोष सुरेश चौधरी उर्फ वैतू हा पोलीस रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार असून त्याच्याविरुध्द मालाड, खार, जुहू, कांदीवली, बोरीवली, चारकोप, सांताक्रूझ, अंबोली, वर्सोवा, गोरेगांव, ओशिवरा इत्यादी पोलीस ठाण्यात एकूण 30 गुन्ह्यांची नोंद आहेत. संतोष सुरेश चौधरी उर्फ वैतूकडून चोरी केलेली सोन्याचे आणि हिऱ्यांचे दागिने अशी एकूण 36 लाख 40 हजार रुपये किंमतीचा माल जप्त करम्यात आल्याची माहिती गोरेगाव विभागाचे पोलीस निरिक्षक हेमंत सावंत यांनी दिली.