पुणे : महाराष्ट्र राज्याचे कुलदैवत असलेल्या खंडेरायाची सोमवती यात्रा (Khandoba Somvati Yatra) रद्द करण्यात आली आहे. यावेळी निघणारा पालखी सोहळाही रद्द करण्यात आला आहे. कोरोनाच्या (CoronaVirus) पार्श्वभूमीवर भाविकांच्या सुरक्षिततेसाठी हा निर्णय घेतला गेला आहे. तसेच या ठिकाणी कलम १४४ नुसार जेजुरीत जमावबंदी आदेश (Curfew orders in Jejuri) लागू करण्यात आले आहेत.
महाराष्ट्राचे कुलदैवत खंडेरायाची सोमवती यात्रा रद्द । यात्रेनिमित्ताने निघणारा पालखी सोहळाही रद्द । कोरोनाच्या पार्श्वभूमीवर भाविकांच्या सुरक्षिततेसाठी घेतला हा निर्णय । कलम १४४ नुसार जेजुरीत जमावबंदी आदेश लागू । १२ ते १४ डिसेंबरपर्यंत जेजुरीत भाविकांना प्रवेश बंद
— ZEE २४ तास (@zee24taasnews) December 11, 2020
#coronavirus pic.twitter.com/CCsZyTU0K0
जमावबंदी आदेश लागू केल्याने १२ ते १४ डिसेंबरपर्यंत जेजुरीत भाविकांना प्रवेश बंद राहणार आहे. त्यामुळे राज्याच्या विविध भागातील भाविक भक्तांनी देवदर्शनासाठी जेजुरीत येऊ नये, प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे. तसेच पालखी सोहळा रद्द करण्यात आला आहे, याची भाविकांनी नोंद घ्यावी, असे कळविण्यात आले आहे.
ज्या दिवशी सोमवारी अमावस्या येते त्या दिवसास सोमवती असे म्हटले जाते. नदी स्नानासाठी हा पर्वकाळ मानला जातो. या दिवशी मुहूर्तावर कऱ्हानदी स्नानासाठी खंडोबाची पालखी जेजुरी गडावरुन प्रस्थान करते. यावेळी मोठ्या प्रमाणात भंडाराची उधळण करण्यात येते. सगळे वातावरण सुवर्णमय होते. बाणाई मंदिराकडून देव गड उतरुन नंदीचौक, गोसावी मठ, छत्री मंदिर, जानाई मंदिर मार्गाने धालेवाडी पालखी रस्त्याने देव नदीवर पोहचवतात. हे अंतर साधारण सात किमीचे आहे. नदीवर रंभाई विसाव्याजवळ उत्सुव मूर्तींना कऱ्हा स्नान घालण्याची प्रथा आहे. त्यानंतर परतीच्यावेळी पालखी जेजुरीमध्ये जानाई मंदिरासमोर विसावते. रात्री महाद्वार रस्त्याने पालखी मंदिरामध्ये पोहोचते. रोजमरा वाटून सोमवती उत्सावची सांगता होते. मात्र, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर हा पालखी सोहळा रद्द करण्यात आला आहे.