Dead Chicken Nashik Issue: नाशिकमधील देवळा तालुक्यातील चिंचवे गावाजवळ एक अत्यंत विचित्र प्रकार समोर आला आहे. या ठिकाणी मोठ्याप्रमाणात मृत कोंबड्यांचा खच आढळून आला आहे. चांदवडच्या दिशेला जाणाऱ्या मार्गावर राहुड घाटाच्या पायथ्याशी रात्री मोठ्या प्रमाणावर या मृत कोंबड्या एखाद्या ट्रकमधून फेकण्यात आल्याचं बोललं जात आहे. ज्या ठिकाणी या कोंबड्या फेकण्यात आल्या त्या समोरच मारुतीरायाचे मंदिर आहे. अशा पवित्र ठिकाणी घाण टाकल्याने परिसरात प्रचंड दुर्गंधी पसरली असून स्थानिक नागरिक संतप्त झाले आहेत.
नागरिकांनी चिंचवे ग्रामपंचायतीकडे यासंदर्भात तक्रार केली आहे. या मयत कोंबड्यांपैकी अनेक कोंबड्या अज्ञात आजाराने मेलेल्या असल्याने त्याचा आरोग्यावर घातक परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. तसेच मयत कोंबड्या खाण्यासाठी या परिसरात कुत्रे व इतर प्राणी जमा झाल्याने हे प्राणी माणसांवर हल्ला करण्याची शक्यता असल्याचंही सांगितलं जात आहे.
सदर घटनेबद्दल ग्रामस्थांनी संताप व्यक्त केला आहे. हेव्ही बॉयलर कंपनीच्या प्रतिनिधींना गावकऱ्यांनी चांगलेच धारेवर धरल्याचं दिसून आलं. सदर मृत कोंबड्या ज्या पोल्टी व्यावसायिकाने या ठिकाणी आणून टाकल्या त्यांनीच त्या भरुन त्यांच्याच शेतात खड्डा करुन विल्हेवाट लावावी असा अग्रह ग्रामस्थांनी धरला.
मात्र मध्यस्थीनंतर कंपनी प्रतिनिधींनी विनंती केल्यावर या कोंबड्यांना खड्ड्यात पुरण्याची व्यवस्था करण्यात आली. तसेच अशी घटना पुन्हा होणार नाही याची दक्षता घेतली जाईल असे अश्वासनही गावकऱ्यांना दिल्याने सद वाद शमला.