Deenanath Mangeshkar Hospital Press Conference: भाजपाचे विधान परिषदेचे आमदार अमित गोरखे यांचे स्वीय सहायक सुशांत भिसे यांच्या पत्नी तनिषा भिसे यांच्या मृत्यूनंतर दिनानाथ मंगेशकर रुग्णालयाविरोधात संताप व्यक्त केला जात आहे. दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाने 10 लाखांचं डिपॉझिट भरण्यास सांगितल्याने भिसे कुटुंबियांना दुसऱ्या रुग्णालयात जावं लागलं होतं. या सर्व गडबडीत तनिषा भिसे यांची प्रसूती झाली. त्यांनी जुळ्या मुलींना जन्मही दिला. पण प्रसूतीनंतर तनिषा भिसे यांचं निधन झालं. दरम्यान 10 लाख मागितले ही गोष्ट खरी असल्याचं डॉक्टर धनंजय केळकर यांनी सांगितलं आहे.
पैसे मागण्याचे अधिकार कोणाला आहेत? असं विचारलं असता त्यांनी सांगितलं की, "आमच्याकडे डॉक्टरांकडून डिपॉझिट मागण्याची पद्धत नाही. आमच्या अॅडमिशनच्या पेपरवर खर्चाचं अंदाजपत्रक लिहिलं जातं. हा पेपर प्रत्येक रुग्णाला दिला जातो. त्यावर डिपॉझिटची रक्कम लिहिण्याची पद्धतच नाही. पण त्यादिवशी राहू, केतू काही कारणाने डॉक्टरांच्या डोक्यात आलं आणि कागदावर चौकोन करुन त्यात 10 लाख डिपॉझिट लिहिलं. ही गोष्ट खरी आहे".
पुढे ते म्हणाले की, "असं कोणीही लिहित नाही. तुम्ही कोणालाही विचारु शकता. मी रोज इथे 10 शस्त्रक्रिया करतो. पण आजपर्यंत कोणत्याही रुग्णाला असं लिहून दिलेलं नाही. या लोकांनी काय दिलं असेल त्यांना विचारु शकता. जर कोणाला डिपॉझिट घ्यायचं असेल तर ते डॉक्टराशी बोलून, समजून या रकमेपैकी किती रक्कम घ्यायची हे काही केसमध्ये ठरवलं जातं. या केसमध्ये अशा प्रकारचं डिपॉझिट डॉक्टराशी बोलून त्यांनी रुग्णाला सांगितलं".
रुग्णालयात डिपॉझिट घेण्याची पद्धत कधीच नव्हती. 5 ते 10 लाखांच्या पुढे रक्कम असल्यास ती घेतली जात होती, पण ती आता बंद करण्यात आली आहे अशी माहिती डॉ धनंजय केळकर यांनी यावेळी दिली. रुग्णालय जबाबदार आहे असं तुम्ही मानता का? असं विचारलं असता त्यांनी आम्ही अहवालाची वाट पाहत आहोत, त्याचा अभ्यास करुन सांगू असं उत्तर दिलं. जे रुग्ण गरीब होते त्यांच्याकडून डिपॉझिट घेतलं जात नव्हतं. जे रुग्ण भरु शकतात त्यांच्याकडून घेतलं जातं असंही त्यांनी सांगितलं.
"मला पेशंटच्या नातेवाईकाचा फोन आला होता. त्यांनी सांगितलं की, ते माझ्याकडे डिपॉजिट मागत आहेत. माझ्याकडे इतकी रक्कम नाही. मी तुमच्याकडे किती रक्कम आहे असं विचारलं. तर त्यांनी मी दोन अडीच लाख भरु शकतो. मी म्हटलं तुम्ही तेवढे भरा, बाकी सूचना मी देतो. ते मी सांगितलेल्या गोष्टीला नाही म्हणणार नाहीत. मी त्यावेळी ऑपरेशन करत होतो. त्यावेळी तेवढंच बोलणं झालं होतं. मला 2 ते 2.15 च्या आसपास फोन आला होता," असंही त्यांनी सांगितलं.