Ajit Pawar on Pune Bus Rape: पुण्यातील वर्दळीचं बसस्थानक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या स्वारगेट बसस्थानकात तरुणीवर बलात्कार करण्यात आल्याने एकच खळबळ उडाली आहे. 26 वर्षीय तरुणीवर शिवशाही बसमध्ये बलात्कार करण्यात आल्यानंतर कायदा आणि सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. महिलेने पोलीस ठाण्यात तक्रार केल्यानंतर ही घटना उघडकीस आली. आरोपी फरार असून त्याचा शोध घेतला जात आहे. यादरम्यान उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी स्वारगेट बस स्थानकातील घटना क्लेशदायक, संतापदायक, शरमेने मान खाली घालायला लावणारी आहे अशा शब्दांत संताप व्यक्त केला आहे.
अजित पवार यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना सांगितलं की, "काल पहाटे पुण्याच्या स्वारगेट बसस्थानकाच अत्यंत दुर्दैवी घटना घडली आहे. 9.30 वाजता पोलिसांनी तक्रार मिळाली. पोलिसांचा तपास सुरु असून मी आयुक्तांशी बोललो आहे. संशयितपणे फिरणारा आरोपी शिरुर तालुक्यातील आहे. एकाला ताब्यात घेतलं असून तो आरोपी सापडला नाही. पोलीस शिरुर आणि आसपासच्या परिसरात शोध घेत आहेत".
"ही घटना क्लेशदायक आहे यात दुमत नाही. आपण काळजी घेण्याचा प्रयत्न करुनही अशा दुर्दैवी घटना घडत आहे. पोलिसांना बारकाईने सीसीटीव्हीची पाहणी करण्यास सांगितलं आहे. हे वर्दळीचं बसस्थानक आहे. महाराष्ट्रातील वेगवेगळ्या भागात या बस जातात. आरोपी काही करुन सापडला पाहिजे आणि फाशीची शिक्षा झाली पाहिजे असं मी सांगितलं आहे," असंही त्यांनी सांगितलं.
स्वारगेट बस स्थानकातील घटना क्लेशदायक, संतापदायक, शरमेने मान खाली घालायला लावणारी
— Ajit Pawar (@AjitPawarSpeaks) February 26, 2025
पुण्यातील स्वारगेट बस स्थानकात आपल्या एका भगिनीवर झालेल्या बलात्काराची घटना अत्यंत दुर्दैवी, क्लेशदायक, सुसंस्कृत समाजातील सर्वांना संताप आणणारी, शरमेने मान खाली घालायला लावणारी आहे. या…
पुढे ते म्हणाले, "पालकमंत्री आणि उपमुख्यमंत्री या नात्याने मला फार मनस्ताप होत आहे. सुसंस्कृत महाराष्ट्र, पुणेकरांना ही गोष्ट अजिबात आवडणारी नाही. तिथे जवळच पोलीस चौकी आहे. मुलगा ताब्यात आल्यानंतर तात्काळ कारवाई कशी करायची. फास्टट्रॅक कोर्टासंबंधी मुख्यमंत्री खबरदारी घेत आहेत. त्यांनीही याप्रकरणी सूचना दिल्या आहेत".
3 तारखेला अधिवेशन होणार आहे. आज 26 तारीख असून दोन, तीन दिवसांत अधिवेशन होईल. यासंदर्भातील जो तपास करायचा आहे तो सुरु आहे. काल 9.30 वाजता तक्रार केली आणि आज मीडियाला हे कळलं. विरोधक पण पोहोचले असून, आंदोलन करत आहेत. तेदेखील आपल्या परीने सांगत असतात. आरोपी ताब्यात आल्याशिवाय सगळा घटनाक्रम समजणार नाही असंही त्यांनी म्हटलं.
याआधी एक्सवर पोस्ट शेअर करत त्यांनी सांगितलं की, "पुण्यातील स्वारगेट बस स्थानकात आपल्या एका भगिनीवर झालेल्या बलात्काराची घटना अत्यंत दुर्दैवी, क्लेशदायक, सुसंस्कृत समाजातील सर्वांना संताप आणणारी, शरमेने मान खाली घालायला लावणारी आहे. या गुन्ह्यातील आरोपीने केलेला गुन्हा अक्षम्य असून त्याला फाशीशिवाय दुसरी शिक्षा असू शकत नाही," असं अजित पवार म्हणाले आहेत. मी स्वतः पुणे पोलीस आयुक्तांना यासंदर्भात व्यक्तिशः लक्ष घालून तपास करण्याचे, आरोपीला तात्काळ अटक करण्याचे निर्देश दिले आहेत".
"मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही हा गुन्हा गांभीर्याने घेतला असून पोलिसांना आवश्यक सूचना दिल्या आहेत. पोलिसांकडून आरोपीला लवकरात लवकर अटक केली जाईल आणि त्याला कायद्यानुसार कठोरात कठोर शिक्षा होईल, यासाठी राज्य शासन सर्व पावले उचलेल, हा विश्वास महाराष्ट्रातील माझ्या तमाम बंधू-भगिनी, मातांना देतो. पीडित बहिणीला न्याय, मानसिक आधार, सर्वतोपरी मदत करण्याच्या सूचना महिला व बाल विकासमंत्री तसेच राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष यांना देण्यात आल्या आहेत," असंही त्यांनी सांगितलं आहे.