Maharashtra Vidhan Sabha Election : राज्यातील विधानसभा निवडणूक कधी जाहीर होणार याची सर्वच राजकीय पक्षांना उत्सुकता लागली होती. अशातच आज केंद्रीय निवडणूक आयोगाने पत्रकार परिषद घेऊन महाराष्ट्र आणि झारखंड या राज्यांच्या विधानसभा निवडणुकांच्या तारखा आज जाहीर केल्या आहेत. महाराष्ट्रात 20 नोव्हेंबर रोजी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. तर 23 नोव्हेंबर रोजी निवडणुकीचा निकाल जाहीर केला जाणार आहे. 25 नोव्हेंबरपर्यंत निवडणूक प्रक्रिया पार पाडणं हे निवडणूक आयोगाचं उद्दीष्ट असणार आहे.
दरम्यान, निवडणूक आयुक्त राजीव कुमार म्हणाले की, महाराष्ट्रातील शहरी भागांमध्ये अनेक मतदारसंघांबाबत आम्हाला चिंता आहे. या भागातील मतदारांना आम्ही विनंती करतो की ज्या दिवशी मतदान आहे. त्या दिवशी मतदारांनी घराबाहेर पडावे आणि आपल्या मतदानाचा हक्क बजवावा आणि लोकशाहीच्या या उत्सहात सहभागी व्हावे.
देवेंद्र फडणवीस यांच्या ट्विटमध्ये काय?
गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसंदर्भात सर्वत्र चर्चा सुरु होती. अशातच आता निवडणूक आयोगाने पत्रकार परिषद घेऊन निवडणुकांची घोषणा केली आहे. निवडणुकीची घोषणा होताच राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या ट्विटरवर एक पोस्ट शेअर केले आहे.
ज्यामध्ये त्यांनी म्हटलं आहे की, 'आरंभ...' म्हणत देवेंद्र फडणवीस यांनी एक व्हिडीओ देखील शेअर केला आहे. येणाऱ्या निवडणुकीत मतदार महायुतीला मतरुपी आशीर्वाद देतील असा दावा त्यांनी केला आहे. त्यासोबत देवेंद्र फडणवीस यांनी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी कार्यक्रमातील महिलांनी राखी बांधतानाचा व्हिडीओ देखील पोस्ट केले आहेत. त्याचबरोबर राजकीय सभांना हजेरी लावत असल्याचे फोटो आणि भाषण करतानाचे फोटो यांचा मिळून त्यांनी एक व्हिडीओ तयार केला आहे. आता निवडणुका जाहीर झाल्या आहेत. त्यानंतर राजकारणात काय काय होणार आहे. याची झलक देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या ट्विटमधून दाखवली आहे.
लोकशाहीतील सर्वोच्च महोत्सवाची आज घोषणा झाली.
— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) October 15, 2024
दिवाळीत प्रकाश पर्व असेल !
आणि पाठोपाठ दुसरे विकासाचे प्रकाशपर्व आपण 20 नोव्हेंबरला एकत्र साजरे करू!
भाजपाच्या नेतृत्वात आपण 2014, 2019 ला भरभरून यश दिले, संपूर्ण बहुमत दिले.
चला पुन्हा सारे मिळून सोबत येऊ या,
आणि 23 नोव्हेंबरला… https://t.co/j4nAq2CTMt
देवेंद्र फडणवीस नेमकं काय म्हणाले?
लोकशाहीतील सर्वोच्च महोत्सवाची आज घोषणा झाली. दिवाळीत प्रकाश पर्व असेल ! आणि पाठोपाठ दुसरे विकासाचे प्रकाशपर्व आपण 20 नोव्हेंबरला एकत्र साजरे करू! भाजपाच्या नेतृत्वात आपण 2014, 2019 ला भरभरून यश दिले, संपूर्ण बहुमत दिले. चला पुन्हा सारे मिळून सोबत येऊ या, आणि 23 नोव्हेंबरला महायुतीच्या विजयाचा जल्लोष करू या! या लोकउत्सवात आपणही सारे मोठ्या संख्येने सहभागी व्हा! विकासासाठी महाराष्ट्र तुमच्या आशिर्वादाची आणि भक्कम जनादेशाची वाट बघतोय... असं देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या ट्विटमध्ये म्हटलं आहे.