Marathi News> महाराष्ट्र बातम्या
Advertisement

'माझ्याकडे काय जादूची कांडी नाही,' अजित पवार बीडकरांवर संतापले, 'मलाच ढुसण्या...' '...तर पालकमंत्रीपद सोडतो'

Ajit Pawar in Beed: उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बीड दौऱ्यात संताप व्यक्त करताना मी हवं तर पालकमंत्रीपद सोडतो असा इशारा दिला. तसंच माझ्याकडे जादूची कांडी नाही, तुम्ही सहकार्य करा असं आवाहनही केलं.   

'माझ्याकडे काय जादूची कांडी नाही,' अजित पवार बीडकरांवर संतापले, 'मलाच ढुसण्या...' '...तर पालकमंत्रीपद सोडतो'

Ajit Pawar in Beed: उपमुख्यमंत्री अजित पवारांनी गुरुवारी बीड शहरातील चंपावती क्रीडा मंडळ, कंकालेश्वर मंदिर आणि जिल्हा रुग्णालय येथे सुरू असलेल्या व प्रस्तावित विकासकामांची पाहणी केली. यावेळी त्यांनी शहरात सुरु असलेल्या कामांचा आढावा घेत, संबंधित अधिकाऱ्यांकडून सविस्तर माहिती जाणून घेतली. दरम्यान यावेळी अजित पवार काहीसे संतापलेलेही दिसले. त्यांनी संताप व्यक्त करताना मी हवं तर पालकमंत्रीपद सोडतो असा इशारा दिला. तसंच माझ्याकडे जादूची कांडी नाही, तुम्ही सहकार्य करा असं आवाहनही केलं. 

अजित पवार जिल्हा क्रीडा संकुलावर पोहोचल्यानंतर तिथे उपस्थित असलेले काही खेळाडू आणि ज्येष्ठ नागरिकांनी विविध सूचना आणि समस्या मांडल्या. यावेळी अजित पवार यांनी याआधी तुम्ही ज्या लोकप्रतिनिधींना निवडून दिलं, त्यांनी काहीच केलं नाही. आता मला कोणाचे काही काढायचे नाही. परंतु मी करायला लागलो, तर मलाच ढुसण्या मारायला लागले. माझ्याकडे काही जादूची कांडी नाही. तुम्ही सहकार्य करा. मी पण सहकार्य करतो. नाहीतर मी परत जातो. मग कुणाला पालकमंत्री करायचं असेल, त्यांना पालकमंत्री करा, अशा शब्दांत संताप व्यक्त केला. 

पोस्ट करत दिली दौऱ्यातील घडामोडींची माहिती

अजित पवारांनी एक्सवर पोस्ट करत सांगितलं आहे की, "आज बीड शहरातील चंपावती क्रीडा मंडळ, कंकालेश्वर मंदिर आणि जिल्हा रुग्णालय येथे सुरू असलेल्या व प्रस्तावित विकासकामांची पाहणी केली. शहरात सुरु असलेल्या कामांचा आढावा घेत, संबंधित अधिकाऱ्यांकडून सविस्तर माहिती जाणून घेतली. प्रत्येक प्रकल्पात आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून, कामांची गुणवत्ता, टिकावूपणा आणि वेळेचं नियोजन यावर भर द्यावा, असे स्पष्ट निर्देश दिले".

"कंकालेश्वर मंदिर येथे पाहणी करताना संबंधित अधिकाऱ्यांकडून कामाची माहिती घेतली. हे देवस्थान बीड शहरासह जिल्ह्यातील भाविकांचं श्रद्धास्थान आहे. यानिमित्तानं कंकालेश्वर मंदिरात जाऊन महादेवाचे मनोभावे दर्शन घेतले. कंकालेश्वर देवस्थान परिसरात नव्यानं सुरू करण्यात येणाऱ्या विकास कामांमध्ये पारंपरिक व आधुनिकतेचा संगम साधत बीडकरांना कायम स्मरणात राहील. तसंच बीडच्या वैभवात भर घालणारी, दर्जेदार कामं करावी. विकासकामं करताना ती कामं गुणवत्तापूर्ण, टिकाऊ आणि वेळेत पूर्ण होतील, याकडे लक्ष द्यावं. भाविकांना सर्व सोयीसुविधा मिळतील अशा सर्व बाबींचा आराखड्यामध्ये समावेश करावा, अशा सूचना दिल्या," असंही त्यांनी सांगितलं आहे. 

"जिल्हा क्रीडा संकुलाच्या कामाची माहिती घेतली. क्रीडा संकुलाच्या कामामुळे बीडकर नागरिकांना सुसज्ज क्रीडा संकुल उपलब्ध होणार आहे. यासाठी नागरिकांनी सहकार्य करावं, क्रीडा संकुलालगत असलेला संपूर्ण परिसर स्वच्छ करावा, या परिसरात कुठेही कचरा दिसणार नाही याबाबत नगरपालिका प्रशासनानं दक्षता घ्यावी, असे निर्देश दिले," अशी माहिती त्यांनी दिली. 

"जिल्हा रुग्णालय येथे सुरू असलेल्या कामाचीही पाहणी केली. इमारतीची कामं करताना आगामी ५० वर्षांचा सर्वांगीण विचार केला पाहिजे. वीज, वाहनतळ, अग्निशामन यंत्रणा, सुरक्षिततेच्या दृष्टीनं अत्याधुनिक यंत्रणेचा वापर केला पाहिजे. इमारत पूर्ण झाल्यानंतर नागरिकांना समाधान वाटेल, असं कामं झालं पाहिजे, अशा सूचना केल्या," असंही त्यांनी सांगितलं. 

Read More