Eknath Shinde About Neelam Gorhe Comment: विधानपरिषदेच्या उपसभापती निलम गोऱ्हेंनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर केलेल्या टीकेवरुन रान उठलेलं असतानाच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी या प्रकरणामध्ये निलम गोऱ्हेंची पाठराखण केल्याचं दिसत आहे. सदर प्रकरणावर पहिल्यांदाच प्रतिक्रिया नोंदवताना शिंदेंनी, "लाडकी बहिण डॉ. निलम गोऱ्हे यांनी दिल्लीच्या साहित्य संमेलनातील व्यासपीठावरुन एक वाक्य बोलल्या ते काहीजणांना प्रचंड झोंबले. गोऱ्हेंनी त्यांचे काळे धंदे बाहेर काढल्याने त्यांना मिरच्या लागल्या," अशी घणाघाती टीका केली. अंधेरी येथे शिवसेना आमदार मुरजी पटेल यांनी आयोजित केलेल्या आभार सभेत बोलताना शिंदेंनी या विषयावर भाष्य केलं.
"निलम गोऱ्हे त्यांच्याबाबत आताच बोलल्यात असे नाही, यापूर्वी अनेक लोक बोलले आहेत. राज ठाकरे बोलले त्यांना खोके नाही तर कंटेनर लागतात. नारायण राणे, रामदास कदम, नितेश राणे, निलेश राणे देखील यापूर्वी बोलले आहेत. मात्र लाडकी बहिण डॉ. निलम गोऱ्हे बोलल्या. त्यांच्यावर खालच्या पातळीवर जाऊन टीका करणे तुम्हाला शोभत नाही. त्या खरे बोलल्या. आमची देना बँक आहे आणि समोर लेना बँक आहे. निलमताई जे बोलल्या ते कटुसत्य आहे. महिलांवर अत्याचार झाल्यास पहिल्या धावून जाणाऱ्या निलमताई होत्या. शक्ती विधेयकामध्ये निलमताईंचे योगदान मोठं आहे. जे चांगलं काम करतात त्यांना बदनाम कसं करायची ही पोटदुखी आहे. तुम्ही डॉक्टरकडून नाही तर कंपाऊंडरकडून औषध घेत असल्याने पोटदुखी बरी होत नाही," अशी टीका उपमुख्यमंत्री शिंदे यांनी उद्धव ठाकरेंना लक्ष्य करताना केली.
"अडीच वर्षांपूर्वी आम्ही उठाव केला तेव्हा रोज आम्हाला शिव्याशाप देण्याचे काम त्यांनी केले पण आम्ही त्यांना कामातून उत्तर दिले. जेव्हा त्यांची खुर्ची गेली तेव्हापासून यांना मिर्ची लागली," असा टोला उपमुख्यमंत्री शिंदे यांनी यावेळी लगावला. "अयोध्येत राममंदीर बांधले आणि कश्मिरमधील 370 कलम रद्द करुन बाळासाहेबांचे स्वप्न साकार करणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह यांच्यावरही तुम्ही सकाळ संध्याकाळ टीका केली. चांगले काम करणाऱ्याला बदनाम करण्याचा हातखंडा तुमच्याकडे आहे," अशी टीका शिंदेंनी केली.
नक्की वाचा >> ''मर्सिडिज गाडीच नव्हे तर वहिनींची रेशमी साडी...'; उद्धव यांचा 'BMC टक्कापुरुष' उल्लेख करत टीका
"प्रयागराज येथे काल गंगा, यमुना सरस्वती या त्रिवेणी संगमावर स्नान केले. माझ्या लाडक्या बहिणींवर मायेची पाखर ठेव आणि असाच आशिर्वाद कायम ठेव, लाडक्या बहिणींची सेवा करण्याची अशीच संधी आम्हाला मिळत राहो, अशी प्रार्थना गंगा मातेला केली. लाडक्या बहिणींची योजना गेम चेंजर नाही तर लाईफ चेंजर आहे," असे उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले. "मुरजी काका इथल्या लोकांसाठी अर्ध्या रात्री मदतीला जाणारा आहे. त्यामुळेच निवडणुकीत 25 हजारांच्या मताधिक्क्याने निवडून येईल, हा शब्द मुरजी काकाने खरा करुन दाखवला. निवडणुकीत लाडक्या बहिणींची महालाट आली. नारीशक्ती महायुतीच्या मागे उभी राहिली आणि महायुतीचा प्रचंड विजय झाला," असे उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले.
सत्ता येईल आणि जाईल पदं येतील जातील पण लाडक्या बहिणींचा लाडका भाऊ ही ओळख आणि सन्मान सर्वात मोठा असल्याची भावना उपमुख्यमंत्री शिंदे यांनी व्यक्त केली. "2022 मध्ये नगरविकास मंत्री असताना आठ मंत्र्यांसह सत्ता सोडून दिली. काँग्रेसच्या दावणीला बांधलेला धनुष्यबाण एकनाथ शिंदेंने उठाव केला. पदाची भूक कधीच नव्हती. मी कालही कार्यकर्ता, आजही कार्यकर्ता आणि उद्याही कार्यकर्ता म्हणूनच वागणार," असा पुनरुच्चार उपमुख्यमंत्री शिंदे यांनी केला. "सर्वसामान्य जनतेसाठी आपले सरकार काम करत आहेत. अडीच वर्षांत मुख्यमंत्री सहायत्ता निधीमधून 460 कोटी रुपये दिले. महायुतीच्या प्रचंड विजयाने आमची जबाबदारी वाढली आहे. लाडक्या बहिणींना सन्मान देणं त्यांना आत्मनिर्भर करायचे आहे," असं उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले.
"कोरोना काळात खिचडी घोटाळा, कोरोना सेंटर घोटाळा, बॉडीबॅग घोटाळा तुम्ही केलात. मुंबईच्या रस्त्यांच्या दुरुस्तीवर पैसे खाल्ले. काहीजणांचा जीव मुंबई महापालिकेत आहे. मुंबई महापालिका ज्यांना सोन्याची अंड देणारी कोंबडी वाटते त्या लोकांना आता आणखी एक धक्का द्यायचा आहे," असे आवाहन उपमुख्यमंत्री शिंदे यांनी केला. "मिशन मुंबईच्या माध्यमातून आगामी महापालिका निवडणुकीत त्यांना घरी बसवायचे आहे. महायुती मजबूत झाली पाहिजे हाच आपला अजेंडा आहे. मुंबई महापालिकेवार भगवा डौलाने फडकवुया हा संकल्प आज करुया," असे शिंदे भाषणाच्या शेवटी म्हणाले.