योगेश खरे (प्रतिनिधी) नाशिक : शिवसेना UBTमधून हकालपट्टी करण्यात आलेले सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशासाठी भाजप पायघड्या घालत असल्याचं समोर आलंय,. कारण बडगुजर आणि गणेश गिते यांच्यासह 10 ते 12 जणांचा उद्या भाजपमध्ये प्रवेश होणार आहे. या पक्षप्रवेशाला स्थानिक आमदार, शहराध्यक्षांनी विरोधा केला होता. मात्र या विरोधाला झुगारुन उद्या हा प्रवेश होणार असल्याचं निश्चित झालं आहे.
नाशिकच्या भाजप नेत्यांच्या विरोधाला न जुमानता उद्धव ठाकरेंचे शिलेदार सुधाकर बडगुजर यांचा भाजप प्रवेश निश्चित झालाय. गेल्या काही दिवसांपासून भाजप नेत्यांच्या विरोधामुळं रख़डलेला प्रवेशाचा मार्ग अखेर सुकर झालाय. मंगळवारी सुधाकर बडगुजर हाती कमळ घेणार आहेत. गिरीश महाजन आणि रवींद्र चव्हाणांच्या तंबीनंतर काही स्थानिक नेत्यांनी बडगुजरांच्या प्रवेशाला संमती दर्शवलीये.
नाशिकमधील सर्व स्थानिक नेत्यांची नाराजी दूर करण्यात महाजन आणि चव्हाणांना अद्यापही यश आलं नाहीये. काही स्थानिक नेत्यांचा विरोध अद्यापही कायम दिसतोय. आमदार सीमा हिरे यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत विरोध मावळला नसल्याचं स्पष्ट केलंय. काही दिवसांपूर्वीच नाराज आमदार सीमा हिरे यांनी माजी नगरसेवक आणि पदाधिका-यांसोबत चंद्रशेखर बावनकुळेंचीही भेट घेतली होती.बडगुजरांना प्रवेश देऊ नये अशी मागणी करण्यात आली होती.
आगामी महापालिका निवडणुकीत नाशिक पुन्हा ताब्यात घेण्यासाठी भाजपला बडगुजरांसारखा नेता हवाय.बडगुजरांसह राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे गणेश गीतेही भाजपात प्रवेश करणार आहेत. सुधाकर बडगुजरांचे दाऊदचा हस्तक सलीम कुत्तासोबत संबंध असल्याचा आरोप करण्यात आला. त्याच बडगुजरांना पक्षात घेण्यासाठी भाजपने फिल्डींग लावली होती. बडगुजरांच्या पक्षप्रवेशाने नाशिकमध्ये भाजपची ताकद वाढेल. मात्र सोबत पक्षातील अंतर्गत नाराजी पूर्णपणे शमवण्याचं मोठं आव्हान भाजपसमोर असणार आहे.