Three New Municipal Corporations In Pune (चंद्रकांत फुंदे) : पुणे जिल्ह्यात नवीन महापालिका तयार करण्यावरून महायुती सरकारमध्येच मतभेद असल्याचं समोर आल आहे. पालकमंत्री अजित पवार यांनी हडपसर, चाकण आणि हिंजवडी अशा तीन नव्या महापालिका महापालिका निर्माण करण्याची गरज व्यक्त केलीय तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मात्र पुण्यात तीन नाहीतर फक्त एकाच नव्या महापालिकेची चर्चा कानावर असल्याचं खुलासा केला आहे. पाहुयात पुण्यात नवीन मनपावरून महायुतीतच कसं राजकारण रंगलंय.
पुण्यात खरंतर 2017 सालीच 11 गावं समाविष्ट झाल्यापासूनच हडपसर या तिसऱ्या स्वतंत्र महापालिकेची मागणी होतेय आणि त्यासाठी राष्ट्रवादीच नेहमी आग्रही राहिलीय कारण या भागात त्यांचेच नगरसेवक निवडून येतात. पण आता अजित पवारांनी त्याही पुढे जात थेट तीन नव्याच मनपांची मागणी जाहिर करून टाकलीय. हिंजवडी, चाकण आणि मांजरी अशा तीन स्वतंत्र मनपांची गरज त्यांनी काल चाकणमधे बोलताना बोलून दाखवलीय.
दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माञ अजितदादांच्या मताशी अप्रत्यक्ष असहमती दर्शवत फक्त तिसऱ्या मनपाची चर्चा माझ्या कानावर असल्याचं खुलासा केला आहे. पुणे भाजपचे नवे नेते मुरली मोहोळ यांनीही तिसऱ्या मनपाबाबत काहिसी सावध भूमिका घेतली आहे. पुणे मनपावर कधीकाळी काँग्रेस तर 2012 साली पुणे पँटर्नच्या माध्यमातून राष्ट्रवादी सत्तेत आली होती पण 2014 साली भाजपने पुणे मनपावर पूर्ण सत्ता काबीज केल्याने राष्ट्रवादीची शहरात राजकीय कोंडी झालीय अशातच मविआ काळात 23 गावं नव्याने सामिल होताच हडपसर भागासाठी तिसऱ्या मनपाने नव्याने जोर धरला होता.
कारण पुणे नाही तर किमान हडपसर या प्रस्तावित मनपात तरी आपली सत्ता येईल, असा राष्ट्रवादीचा होरा होता पण भाजप त्यालाही फारसी उत्सूक दिसत नाही कदाचित म्हणूनच अजित दादांनी थेट तीन नव्या मनपांचा बॉम्बगोळा टाकल्याचं बोललं जातंय.पण भाजपला आता स्वबळाची चाचपणी करायची असल्याने तीन नव्या मनपा सोडा किमान हडपसरच्या रुपाने मिळू पाहणारी तिसरी मनपा बनण्याचं स्वप्न ही दुरापास्त बनून गेले आहे.