Devendra Fadanvis On Rahul Gandhi: विधानसभा निवडणुकीत फिक्सिंग झाल्याच्या राहुल गांधींच्या आरोपाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर दिलं आहे. फडणवीसांना त्याबाबत एक सविस्तर लेखच लिहिला आहे. जनता त्यांना नाकारते, ते जनादेशाला नाकारतात म्हणत फडणवीसांनी राहुल गांधींवर पलटवार केला आहे. सोबतच जनादेशाचा अपमान कराल तर जनता माफ करणार नाही असा थेट इशाराही फडणवीसांनी काँग्रेसला दिला आहे.
'गडचिरोलीतून ७ जूनला सकाळी नागपूरकडे परतताना मला पत्रकारांनी राहुल गांधी यांनी एक लेख लिहिल्याचे निदर्शनास आणून दिले, मी त्यांना म्हणालो, कशावर लिहिला आहे? ते म्हणाले, महाराष्ट्रातील विधानसभा निवडणूक । खरे तर हा विषय उगाळून आता जुना झाला. निवडणूक आयोगाने तर वेळोवेळी त्याला उत्तरेही दिली, ती उत्तरे न वाचताच त्यांना लेखक होण्याची खुमखुमी आली असेल, तर माझ्या त्यांना शुभेच्छा! पण, त्याचवेळी एक न मागितलेला सल्लाही. एकदा पराभव स्वीकारून आपण कुठे चुकतो आहोत, जनतेशी आपला कनेक्ट कुठे कमी पडतो, त्यासाठी काय केले पाहिजे, याचा विचार केला तर ते अधिक सयुक्तिक ठरेल, बाकी या लेखाला अनुल्लेखानेच उत्तर द्यायला हवे. पण, एक तत्त्व आहे, तुम्ही लोकांना 'कन्हीन्स' करू शकत नसाल, तर त्यांना 'कन्फ्यूज' करा. तेच काम राहुल गांधी वारंवार करीत आहेत, त्यामुळे वस्तुस्थिती तितक्याच वेळा जनतेपुढे आणणे हेही काम आपल्याला करत राहावे लागेल,' असं देवेंद्र फडणवीसांनी लेखात नमूद केलं आहे.
'राहुल गांधी यांनी निवडणूक आयोगासंबंधी काही पुराव्यांचे मुद्दे उपस्थित केले आहेत. त्यावर निवडणूक आयोग उत्तर देईलच, पष्ण, मुख्य प्रश्न आहे, तो सातत्याने लोकशाही प्रक्रियेचा अपमान करण्याचा, सातत्याने जनादेशाचा अपमान करण्याचा, जनतेने राहुल गांधींना नाकारले, त्याचा बदला म्हणून ते जनतेला नाकारत आहेत. यातून काँग्रेस पक्ष आणखी गर्तेत जाणार आहे. आपल्याच पक्षाचे आमदार राहुल गांधी यांची एक दिवसात भेट घेऊन दाखवा, अशी विधाने का करतात, यावर त्यांनी आत्मचिंतन करण्याची गरज आहे,' असा टोलाही त्यांनी लगावला आहे.
'सातत्याने लोकशाही प्रक्रियेवर आणि संवैधानिक संस्थांवर शंका उपस्थित करून आपण देशाला कोणत्या दिशेने घेऊन जात आहोत, कोणते विष कालवत आहोत, याचे भान ठेवले पाहिजे. महाराष्ट्रात झालेला पराभव हा किती जिव्हारी लागला, याची मला जाणीव आहे. पण, सातत्याने महाराष्ट्रातील शेतक-यांचा, लाडक्या बहिणींचा, सामान्यजनांचा आणि इतरही नागरिकांच्या कौलाचा तुम्ही असा अपमान करणार असाल, तर महाराष्ट्रातील जनता तुम्हाला कधीही माफ करणार नाही. महाराष्ट्रातील जनतेच्या या अपमानाचा, मुख्यमंत्री या नात्याने त्यांचा सेवक म्हणून मी कायम निषेधच करीन,' असंही फडणवीसांनी नमूद केलं आहे.