How to Identify Real Devgad Mango: आंब्याचा हंगाम आला की, बाजारात आंबे विकत घेण्यासाठी ग्राहक गर्दी करत असतात. आंबे विकणारा कोणीही असला तरी आपल्याकडे अस्सल देवगड आंबा असा दावा केला जातो. अनेकदा ग्राहकही खरा देवगड आंबा ओळखण्यात फसतात आणि नंतर पश्चाताप करतात. पण आता देवगड तालुका आंबा उत्पादक सहकारी संघाने एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. यामुळे देवगड हापूस आंबा ओळखणं सोपं होणार आहे.
खरा देवगड हापूस ओळखायचा कसा हा प्रश्न आपल्याला नेहमीच पडतो. देवगडच्या नावाखाली फसवणूक होत असल्याचे देखील प्रकार घडतात. ती टाळण्यासाठी देवगड तालुका आंबा उत्पादक सहकारी संघामार्फत एक खास युक्ती वापरण्यात येत आहे. देवगड मधून येणाऱ्या प्रत्येक आंब्यावर टॅम्पर प्रूफ युआयडी सील लावण्यात येत आहे. महत्त्वाचं म्हणजे बाजारात देवगडच्या नावाखाली दुसराच आंबा विकणाऱ्यांवर जीआय प्रणाली कायद्यानुसार फौजदारी कारवाईची देखील तरतूद आहे.
देवगड तालुका आंबा उत्पादक संघाचे संचालक ओंकार सप्रे यांनी सांगितलं आहे की, "सहकारी संस्थेने यावर्षीपासून टॅम्पर प्रूफ युआयडी सील लावण्यास सुरुवात केली आहे. प्रत्येक आंब्याला एक वेगळा नंबर मिळतो. याचं प्रमाणीकरण व्हॉट्सअपवर बसवलं आहे. या कोडचा फोटो पाठवला की, दोन हिडन म्हणजे लपवलेले नंबर मागितले जातील. स्टिकर दोन तुकड्यात आहे. ते काढलं असता मागे तो नंबर दिसेल. हा कोड सिस्टमला पाठवल्यानंतर तो कोणत्या शेतकऱ्याला दिला आहे, त्याचा क्रमांक, जीआय नंबर, गाव समजतं. देवगडमधील जे जीआय रजिस्टर्ड शेतकरी आहेत त्यांना त्यांची झाडं आणि उत्पादक क्षमता त्यानुसार हे कोड देण्यात आले आहेत".